मागील दहा दिवसांपासून पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने अचानक इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. तसेच हमासचे अनेक दहशतवादी इस्रायलच्या सीमाभागात घुसले. यावेळी झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा बळी गेला. दरम्यान, हमासने काही इस्रायली नागरिकांचं अपहरण करत त्यांना गाझापट्टीत नेलं आहे. ओलीसांवर हमासकडून अमानुष अत्याचार होत असल्याचा दावा इस्रायली संस्थांकडून केला जात आहे. असं असताना आता हमास संघटनेनं इस्रायली ओलीस तरुणीचा व्हिडीओ जारी केला आहे.

हमासने टेलिग्रामवर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये, ओलीस तरुणीचा हात तुटलेला दिसत असून तिच्यावर एका व्यक्तीकडून वैद्यकीय उपचार केले जात असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडीओमधील पीडित तरुणीने स्वत:ची ओळख मिया शेम अशी करून दिली असून ती शोहम येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं आहे. हमासकडून तिची देखभाल केली जात आहे. तिचा हात तुटल्यावर तिच्यावर गाझा येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला लवकरात लवकर तिच्या घरी जायचं आहे, असंही तरुणी संबंधित व्हिडीओत स्थानिक भाषेत बोलताना दिसत आहे. याबाबतचं वृत्त ‘द जेरुसलेम पोस्ट’ने दिलं आहे.

हेही वाचा- “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

“नमस्कार, मी मिया शेम आहे, मी शोहम येथील रहिवासी असून माझं वय २१ वर्षे आहे. मी सध्या गाझामध्ये आहे. शनिवारी पहाटे लवकर मी Sderot परतले; मी एका पार्टीत होते. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे माझ्या हातावर गाझा रुग्णालयात तीन तास शस्त्रक्रिया केली. ते माझी काळजी घेत आहेत, मला औषध देत आहेत, सर्व काही ठीक आहे,” असं पीडित तरुणीने व्हिडीओत म्हटलं आहे.

हेही वाचा- “…घरातील संपूर्ण फरशी रक्ताने माखली होती”, आजीच्या हत्येबद्दल इस्रायली तरुणीने सांगितला भयावह घटनाक्रम

मियाचा हा व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, याबाबतची कोणतीही पुष्टी ‘लोकसत्ता’ करत नाही. शिवाय या व्हिडीओची सत्यता तपासण्यास ‘लोकसत्ता’ अक्षम आहे. व्हिडीओतील तरुणीच्या कुटुंबाने किंवा कोणत्याही इस्रायली सरकार अथवा संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी या व्हिडीओच्या सत्यतेला दुजोरा दिला नाही. तसेच मिया अजूनही जिवंत आहे की नाही? हेही अद्याप स्पष्ट झालं नाही.

Story img Loader