एपी, देर अल-बलाह (गाझा पट्टी)
इस्रायलच्या तेल अविव या शहरावर हमासने रविवारी रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली किंवा नाही याबद्दल तातडीने माहिती मिळालेली नाही. इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धात इस्रालयने गाझावर गेल्या सहा महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई, सागरी आणि जमिनीवरून हल्ले केले आहेत. त्या तुलनेत हमासने अनेक महिन्यांमध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या रॉकेटने हल्ला केला आहे.
हमासच्या लष्कारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मध्य गाझामधून रॉकेटने हल्ले केले जात असल्याचे आवाज ऐकू येत होते. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रविवारी दिवसभरात दक्षिण गाझामधील राफामधून आठ रॉकेट सोडण्यात आले. इस्रायलच्या लष्कराने अलीकडेच राफामध्ये कारवाईला सुरुवात केली आहे.दुसरीकडे, मदतसामग्री घेऊन येणाऱ्या ट्रकने रविवारी इजिप्तमधून गाझामध्ये प्रवेश केला. मदत सामग्री आणणाऱ्या वाहनांना राफामध्ये प्रवेश करावा लागू नये यासाठी समझोता करण्यात आला आहे.