Israel-Hamas War Hostages in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या २० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. इस्रायली वायूदलाकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरू आहेत. इस्रायली लष्कराने आणि हवाई दलाने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीत मोठं नुकसान झालं आहे. दुसऱ्या बाजूला गाझातल्या लोकांजवळचं अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू जवळपास संपल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दरम्यान, हमासच्या एका कमांडरने असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, आम्हाला इस्रायलबरोबरच्या युद्धात लेबनानमधील हिजबुलल्लाहसह इतर राष्ट्रांकडून हस्तक्षेपची अपेक्षा आहे.
हमास संचालित गाझातील आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीत आतापर्यंत ७,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. २०१४ मध्ये गाझात झालेल्या युद्धात जितकी हानी झाली होती त्यापेक्षा जास्त नुकसान यावेळी झालं आहे. तसेच २०१४ च्या युद्धापेक्षा तीन पटीने अधिक लोक या युद्धात मारले गेले आहेत. तर वेस्ट बँकमध्ये १०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्रं डागली होती. त्यापाठोपाठ हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून इस्रायली नगरिकांची कत्तल केली होती. त्या दिवशी १,४०० हून अधिक इस्रायली नागरिक मरण पावले. तसेच हमासने २२० हून इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं. त्यानंतर इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर हल्ला केला. तेव्हापासून हमास आणि इस्रायलमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. इस्रायली सैन्याने शुक्रवारी सकाळी सांगितलं की त्यांच्या लढाऊ विमानांनी दराज तुफाह बटालियन येथे हमासच्या तीन वरिष्ठ दहशतवाद्यांना ठार केलं.
हे ही वाचा >> इराक अन् सीरियात अमेरिकन सैनिकांवर हल्ले, बायडेन यांचा इराणला थेट इशारा; म्हणाले…
दरम्यान, हमासची सैन्य शाखा अल-कासिम ब्रिगेडने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये कासिम ब्रिगेडने म्हटलं आहे की, इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ओलीस ठेवलेले ५० इस्रायली ठार झाले आहेत. अल जझीराने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने अल-कासिम ब्रिगेडच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितलं की हमासने ५० ओलिसांना ठारल केलं आहे आणि इस्रायली लष्करावर आरोप केला आहे.