मागील चार दिवसांपासून इस्रायल-पॅलेस्टाईन धुमसत आहे. शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत एका वयोवृद्ध इस्रायली महिलेची निर्घृण हत्या केली आहे.
मृत महिलेच्या नातीने हत्येचा भयावह घटनाक्रम सांगितला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी पीडितेच्या आजीला कशाप्रकारे फेसबूक लाईव्ह करून मारलं? याबाबत हृदय पिळवटून टाकणारा अनुभव तिने सांगितला. पीडित तरुणीने सोशल मीडियावर आपल्या आजीच्या हत्येचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा- “…पण शेवट आम्हीच करू”, हमासविरुद्धच्या युद्धाबाबत इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोठं विधान
घटनेचं वर्णन करताना पीडित तरुणीने ‘Visegrad24’ वृत्तवाहिनीला सांगितलं की, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू असताना माझ्या काकूने माझ्या आईला फोन केला आणि फेसबूक उघडण्यास सांगितलं. माझ्या आईला ते अजिबात उघडता आलं नाही, ती थरथरत होती. त्यामुळे मी माझ्या फोनवरून फेसबूक उघडलं आणि कल्पना करता येणार नाही, इतकं वाईट दृश्य दिसलं. माझ्या आजीची, तिच्या घराच्या मजल्यावर हत्या करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. घरातली फरशी रक्ताने माखलेली होती.”
हेही वाचा- “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO
“हमासच्या दहशतवाद्यांनी माझ्या आजीचा फोन घेतला, तिच्या हत्येचं चित्रीकरण केलं आणि तिच्याच खासगी फेसबूक अकाऊंटवरून व्हिडीओ अपलोड केला” असंही पीडित तरुणीने पुढे सांगितलं. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात आतापर्यंत १६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. तसेच इस्रायलकडून केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझापट्टीतील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं आहे.