हमास आणि इस्रायलमधील युद्धाला १७ दिवस झाले आहेत. पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच एक नोवा म्युझिक फेस्टिवलमधील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी नोवा म्युझिक फेस्टिवलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ इस्रायलनं ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात इस्रायली नागरिकांवर कशाप्रकारे हमासच्या दहशतवाद्यांकडून अत्याचार करण्यात आला, हे व्हिडीओतून दिसत आहे. हमासचे दहशतवादी नागरिकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी गाड्याही पेटवून दिल्या आहेत.

इस्रायल वॉर रूमने ‘एक्स’ अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “हमासने नोवा म्युझिक फेस्टिवलवर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. या हल्ल्यात २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिक पळून जाऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी रस्ता अडवला आहे. यानंतर दहशतवाद्यांनी कारमधील लोकांवर गोळ्या झाडल्या. रस्त्यावरील कार पेटवून दिल्या. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही गोळ्या घातल्या गेल्या आहेत.”

दरम्यान, इस्रायल आणि हमासच्या युद्धात ६००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये गाझा पट्टीतील ४,६०० हून अधिक, तर १४०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत गाझा पट्टीमध्ये १४००० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas terrorists shot nova music festival cars blocked escape routes ssa