Foreign Tourist attacked in Karnataka Hampi Rape Case : कर्नाटक येथील हम्पीमध्ये इस्त्रायली पर्यटक महिलेसह दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी हम्पी बलात्कार घटना ही घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.

“मला घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ कारवाई करण्याचे, तसेच काटेकोर तपास करून आरोपींना ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे,” असे सिद्धरामय्या यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी देखील आरोपींवर कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. पोलीस घटनेचा तपास करत असल्याचेही शिवकुमार म्हणाले.

ते म्हणाले की, “मला या बद्दल काल माहिती मिळाली. दोन जणांना अटक करण्यात आले आहे आणि एक जण फरार आहे. ते मध्यरात्री तारे बघण्यासाठी तेथे गेले होते. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. कायद्यानुसार आम्ही कारवाई करू.”

कोप्पल पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यात हंपी वारसा स्थळाजवळ ६ मार्चच्या रात्री तीन पुरूषांनी एका इस्रायली महिलेसह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. तसेच या महिलांबरोबर असलेला एक पुरूष पर्यटक मृत अवस्थेत आढळला आहे.

नेमकं झालं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय होम स्टे ऑपरेटर आणि तीन पुरूष पर्यटक आणि एक इस्त्रायली महिला पर्यटक हे तुंगभद्रा कॅनलच्या जवळ सानापूर लेक येथे तारे पाहण्यासाठी आले होते. हे सर्वजण कॅनलजवळ बसले होते आणि गिटार वाजवत तारे पाहात होते. यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले आणि पेट्रोल कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली.

होमस्टे ऑपरेटरने आरोप केला की, “६ मार्चच्या रात्री जेवणानंतर आम्ही सर्वांनी तारे पहायला जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमची स्कूटर घेऊन सानापूर तलावाजवळील दुर्गाम्मा गुडीजवळील तुंगभद्रा कॅनलच्या काठावर गेलो. आम्ही तारे पाहात आणि गिटार वाजवत असताना सुमारे साडेदहा वाजता तीन व्यक्ती दुचाकीवरून आमच्याकडे आले आणि त्यांना कन्नडमध्ये पेट्रोलबद्दल विचारणा केली.”

जेव्हा होमस्टे मालकाने त्यांना सांगितले की जवळपास पेट्रोल पंप नाही, तेव्हा तिघांपैकी एकाने त्यांच्याकडे १०० रुपये मागितले . ते वारंवार मागणी करत राहिल्याने एका पुरुष पर्यटकाने त्यांना २० रुपये दिले, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

पण त्यानी अधिक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी वाद घालू लागले आणि त्यांना दगडाने मारण्याची धमकी देऊ लागले. या वादानंतर दोन व्यक्तीने मारहाण करत होमस्टे ऑपरेटर आणि इस्त्रायली महिलेवर बलात्कार केला. तर तिसऱ्या व्यक्तीने एका पुरूष पर्यटकाला कॅनलमध्ये ढकलून दिले.

मला खूप रक्तस्त्राव होत होता. दोन आरोपी मिळून मला कॅनेलच्या बाजूला ओढत घेऊन गेले. त्यांच्यापैकी एकाने माझा गळा दाबला आणि माझे कपडे काढले. एक एक करून त्यांनी मला मारहाण केली आणि माझ्यावर बलात्कार केला,” असे होमस्टे ऑपरेटरने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. अशाच पद्धतीने आरोपींपैकी एकाने इस्त्रायली महिलेला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. आम्ही ओरडत आणि रडत असताना तीन आरोपी त्यांच्या दुचाकीवरून निघून गेले असा आरोप महिलेने केला आहे.

Story img Loader