शारदोत्सव आणि तत्सम कार्यानुभवाचा तास पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामधील एका ११ वर्षीय विद्यार्थिनीने चक्क ‘हॅण्डग्रेनेड’ शाळेत आणल्याने शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांची भीतीने गाळण उडाली. ५०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक हातबॉम्बनाटय़ाची दहशत ओसरेस्तोवर शाळेच्या आवारामध्ये ‘भय शिक्षणा’चा तास गिरवत बसले.
सिडनेमधील न्यू साऊथ वेल्स परिसरातील ‘हंटर ख्रिश्चन स्कूल’मध्ये हा विचित्र नाटय़प्रयोग घडला. दुसरे महायुद्ध आणि व्हिएतनाम युद्धाच्या काळामध्ये सर्रास वापरले जाणारे ‘पाइनअ‍ॅपल’ नामक हॅण्डग्रेनेड या मुलीने शाळेमध्ये आणले होते. तिच्या पालकांनी प्रतिकृती असल्याचे समजून खरेदी केलेली ही वस्तू विद्यार्थ्यांचे कुतूहल शमविण्यासाठी म्हणून तिने शाळेत दाखविण्यासाठी आणली होती. मात्र तो खरोखरचा हातबॉम्ब असल्याचा सुगावा एका शिक्षिकेला लागला आणि भीतीचा वणवा वेगात पसरला. पोलीस, बॉम्ब निकामी पथक, मदत पथक, माध्यम लगबग यांनी शाळा गजबजली.
५०० विद्यार्थी आणि ६० शिक्षकांचा लवाजमा तातडीने शाळेजवळच्या मोकळ्या आवारात हलविण्यात आला. न्यू साऊथ वेल्स पोलिसांच्या बॉम्ब पथकाने शाळा सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतर त्या सर्वाचा जीव भांडय़ात पडला. हातबॉम्ब निष्क्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरीही राष्ट्रीय सुरक्षा पथकाने ग्रेनेड तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेले असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. हा हातबॉम्ब सक्रिय असता, तर त्याच्या स्फोटाने अनेकांना गंभीर जखमी केले असते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
या हातबॉम्बला चाप नसल्यामुळे आणि मुलीचा केवळ प्रतिकृती असल्याचा समज झाल्यामुळे हा प्रकार झाला आहे. असे नाटय़ घडेल याची सुतराम कल्पना नसलेल्या मुलीची अवस्था लाजिरवाणी आणि गोंधळलेली झालेली आहे. तिच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे, शाळेचे मुख्याध्यापक बॉयड अ‍ॅलन यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hand grenade drama in austreliaian school