वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हिंदू मंदिराचे पुरावे सापडले आहेत. तसेच मशिदीत जमिनीखाली हिंदू देव-देवतांच्या मूर्तीचे अवशेष आढळून आल्यानंतर हिंदू पक्षकारांनी आनंद व्यक्त केला. त्यातच आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मोठे विधान केले आहे. मुस्लीम पक्षकारांनी सदर मशीद आता हिंदूंच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन गिरीराज सिंह यांनी केले आहे.
‘१५ शिवलिंगं, दोन नंदी आणि…’ ज्ञानवापी परिसरात काय काय सापडलं? ASI च्या अहवालात आहेत ‘या’ नोंदी
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, “अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला. मात्र आम्ही आधीपासून म्हणत होतो की, अयोध्या तो झाँकी है, काशी, मथुरा बाकी है. आता काशीची वेळ आली आहे. पुरातत्त्व विभागाचा अहवाल आला असून माझी मुस्लीम बांधवांना विनंती आहे की, त्यांनी मशीद हिंदूंच्या ताब्यात द्यावी. सर्व पुरावे हिंदूंच्या बाजूने आहेत.”
“माझी मुस्लीम बांधवांना विनंती आहे. सर्व पुरावे आता समोर आले आहेत. त्यांनी वाराणसी (काशी) मधील मशीद हिंदूंना द्यावी आणि जातीय सलोखा राखण्यात मदत करावी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही एकाही मशिदीवर हातोडा चालवला नाही. पण त्याचवेळी पाकिस्तानात मात्र एकही हिंदू मंदिर बाकी ठेवले नाही”, असेही गिरीराज सिंह यावेळी म्हणाले.
गिरीराज सिंह पुढे म्हणाले, जर कुणी बाबर किंवा औरंगजेब बनण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय युवक महाराणा प्रताप यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी कारण चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे.
दोन दिवसांपूर्वीच ज्ञानवापी मशिदीच्या खटल्यातील हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल सार्वजनिक केला. मशिदीच्या जागी पूर्वी मोठे हिंदू मंदिर होते. ते पाडून त्याठिकाणी मशीद उभी करण्यात आल्याचे पुरावे पुरातत्त्व खात्याने सादर केले असल्याचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.