संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अफजल गुरू याला देण्यात आलेल्या फाशीबद्दल युरोपीय समुदायाने खेद व्यक्त केला असून एकंदरीत मृत्युदंडाच्या शिक्षेलाच कायमस्वरूपी स्थगिती देण्याबाबत विचार करावा, अशी विचारणा भारताकडे केली आहे.
युरोपीय समुदायाच्या परराष्ट्रविषयक धोरणाच्या प्रमुख कॅथरीन अ‍ॅश्टोन यांनी यासंबंधात बोलताना अफजल गुरूला फाशी ठोठावल्याची माहिती आम्हाला गेल्या शनिवारीच मिळाली. संसदेतील हल्ल्याची भीषणता, त्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना सोसावे लागलेले दु:ख याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तो सर्वच प्रकार अतिशय भयावह होता. मात्र असे असले तरीही कुठल्याही गंभीर प्रकारच्या गुन्ह्य़ासाठी मृत्युदंडाच्या शिक्षा ठोठावण्याला आमचा तात्त्विक विरोध आहे, असे त्यांनी प्रसृत केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१३ डिसेंबर, २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात नऊजण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर सुमारे एक वर्षांने म्हणजेच डिसेंबर २००२ मध्ये या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अफजल गुरू याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला नोव्हेंबर, २०१२ रोजी फाशी देण्यात आली. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले. मृत्युदंडाच्या शिक्षेला कायमस्वरूपी तहकुबी द्यावी, अशी धारणा जगातील अनेक देशांची आहे, त्यात भारतानेही सहभागी व्हावे, असे आवाहन अश्टोन यांनी या पत्रकाद्वारे केले.

Story img Loader