पोलिसाची हत्या करून जनता आणि सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला केल्याप्रकरणी इजिप्तमधील न्यायालयाने माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या मुस्लीम ब्रदरहूडच्या ५२९ समर्थकांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली.

देशातील सर्वात मोठय़ा खटल्यात न्यायालयाने १६ जणांची निर्दोष सुटका केली. इजिप्तच्या आधुनिक इतिहासात बचाव पक्षातील व्यक्तींना इतक्या मोठय़ा प्रमाणावर शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध याचिका करण्यात येणार असल्याचे बचाव पक्षाचे वकील मोहम्मद शुबेब यांनी सांगितले. आपल्याला युक्तिवाद करण्याची संधीच देण्यात आली नाही, केवळ दोनच सुनावणीनंतर निर्णय देण्यात आला, असा आरोपही शुबेब यांनी केला.
मोर्सी समर्थकांनी कैरोतील चौकात जोरदार निदर्शने केली होती, त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी कारवाई केली होती. या वेळी झालेल्या मोठय़ा आंदोलनात शेकडो ठार झाले होते आणि हजारोंना अटक करण्यात आली होती.
न्यायालयातील सुनावणीच्या वेळी १५० हून अधिक संशयित उपस्थित होते तर अन्य संशयितांना त्यांच्या अनुपस्थितीतच दोषी ठरविण्यात आले. मोर्सी सरकारविरुद्ध उठाव करण्यात आल्यानंतर लष्कराने त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती.

 

Story img Loader