जॉन्सन अॅंड जॉन्सन, हिमालया, नेसले यासारख्या कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी लहान मुलांसाठीची उत्पादने औषध दुकानांमध्ये विक्रीला ठेवण्यावर बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे, असे केंद्रीय रसायन, खते आणि औषधनिर्माण खात्याचे मंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगितले. लहान मुलांसाठीचे तेल, साबण, पावडर, सेरेलॅकसारखे पदार्थ हे काही औषधांच्या गटात मोडत नाहीत. त्यामुळे ते किराणा मालाच्या दुकानातही विकता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या देशातील पहिल्या जनऔषधी केंद्राचे उदघाटन हंसराज अहिर यांच्या हस्ते दिल्लीमध्ये झाले. त्या कार्यक्रमात त्यांनी विविध कंपन्यांकडून लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या उत्पादनांबद्दल मत मांडले. लहान मुलांसाठी तयार करण्यात येणाऱया उत्पादनांचा उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो. मात्र, कंपन्यांकडून ही उत्पादने महाग दरात विकली जातात. त्यातच ही उत्पादने औषध दुकानांमध्ये ठेवण्यात आल्यावर लोकांनाही त्यामध्ये काहीतरी औषधी घटक आहेत, असे वाटते. पण लहान मुलांसाठी तयार केलेले साबण, तेल, पावडर यामध्ये कोणतेही औषधी घटक नसतात. त्यामुळे ती औषध दुकानांमध्ये विक्रीला ठेवण्यावर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत आहे, असे त्यांनी सांगितले.