अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढीचेही राम जन्मभूमी पायाभरणी समारंभानिमित्ताने सुशोभीकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी बुधवारी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान अयोध्येत आल्यानंतर ते पहिल्यांदा हनुमानगढी मंदिरात जाणार आहेत. नंतर ते राम मंदिर पायाभरणी समारंभाला जातील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी या मंदिरास भेट दिली असून पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व धर्मगुरू अंतर ठेवून होते. मोदी हे या मंदिरात ५ ते ७ मिनिटे भेट देणार आहेत. हनुमान मंदिरास ते प्रथमच भेट देत आहेत असे महंत राजू दास यांनी सांगितले.
भूमिपूजनाचा दिवस सुचविणाऱ्या पंडिताला धमक्या
बेळगावी : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पवित्र दिवस कोणता ते सुचविणारे संस्कृत पंडित एन. आर. विजयेंद्र शर्मा यांनी आपल्याला धमक्या देण्यात येत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. बेळगावीमधील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर शर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस तैनात करण्यात आला आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्ताबाबत आपल्याशी संपर्क साधला होता. आपण भूमिपूजनासाठी २९ व ३१ जुलै, १ व ५ ऑगस्ट हे चार दिवस सुचविले होते. हे दिवस श्रावण महिन्यात येत असल्याने ते सुचविल्याचे शर्मा यांनी सांगितले.
मध्य प्रदेश काँग्रेसकडून चांदीच्या ११ विटा
भोपाळ : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा अयोध्येतील राममंदिरासाठी चांदीच्या ११ विटा पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. काँग्रेसच्या सदस्यांकडून गोळा केलेल्या निधीतून चांदीच्या विटा घेण्यात येणार आहेत, त्या मध्य प्रदेशातील जनतेच्या वतीने राममंदिराच्या बांधकामासाठी पाठविण्यात येणार आहेत, असे कमलनाथ म्हणाले.