Hanumangargh Betting On Dog Fight News : राजस्थानच्या हनुमानगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विदेशी जातीच्या कुत्र्यांवर (Dog Fight) सट्टा खेळला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ८१ जणांना अटक केली आहे. राजस्थान पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका फार्म हाऊसवर छापा टाकला. छापा टाकल्यानंतर काहीजणांनी कुत्र्यांवर सट्टा लावल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ८१ जणांवर सट्टेबाजीचा आरोप करण्यात आलेला आहे. हनुमानगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका फार्म हाऊसवर हा सर्व प्रकार सुरु होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी विदेशी जातीचे तब्बल १९ कुत्रे आणि १५ वाहने जप्त केली आहेत.
हनुमानगडच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “शुक्रवारी रात्री उशिरा एका फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी विदेशी जातीच्या कुत्र्यांवर सट्टा खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८१ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकताच अनेकांनी भिंतीवरून उड्या मारून पळ काढला. तसेच काही लोकांकडून परवाना असलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सट्टेबाजी करताना पकडलेले बहुतेक आरोपी पंजाब आणि हरियाणामधील असून खासगी वाहनांत कुत्र्यांसह तेथे पोहोचले होते”, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
हेही वाचा : Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
पोलीस अधीक्षकांनी असंही सांगितलं की, “छाप्यादरम्यान आम्हाला काही कुत्रे जखमी अवस्थेत आढळले. आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत. फार्म हाऊसमध्ये सर्व १९ कुत्रे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींनी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला होता. ज्यामध्ये सुमारे २५० सदस्य आहेत. हे सर्व लोक काही जणांचा गट करत, थोड्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांच्या सट्टेबाजीचे (Dog Fight) आयोजन करायचे आणि त्यावर पैसे लावायचे”, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.