Children’s Day 2018 Google Doodle : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांना लहान मुले खूपच आवडत होती. ते बऱ्याचदा जाहीर कार्यक्रमांदरम्यान लहान मुलांच्या गराड्यात पहायला मिळत. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी (१४ नोव्हेंबर) बालदिन भारतात साजरा केला जातो. यंदा या बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने आज खास डुडल साकारले आहे.
आजच्या डुडलमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच एका बाजूला आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले एक अवकाश यानही दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबरच लहान मुलांमधील जिज्ञासू वृत्तीचे दर्शनही यातून घडवण्यात आले आहे. एक लहान मुलगी एका मोठ्या दुर्बिणीतून अवकाश दर्शन करीत असून तिच्या बाजूला जमिनीवर एक तंबू टाकण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये साहसी खेळ आणि भटकंतीचे संस्कार व्हावे याचे ते प्रतिक आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांना लहान मुलांप्रती खूपच प्रेम होते. ते चाचा नेहरु म्हणून ओळखले जात होते. २७ मे १९६४ रोजी नेहरुंचे निधन झाले. त्यानंतर लहान मुलांप्रती असलेले विशेष प्रेम लक्षात घेता नेहरुंच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बालदिन केवळ भारतातच साजरा केला जात नसून जगभरात तो साजरा केला जातो. मात्र, जगातील विविध देशांमध्ये तो विविध दिवशी साजरा केला जातो. भारतात हा दिवस साजरा करण्यासाठी पंडित नेहरुंचा जन्मदिवस निश्चित करण्यात आला आहे.