नववर्षांचे स्वागत करण्यासाठी जगभरात उत्साहाला उधाण आलेले असून गुगलनेही आपण या आनंदोत्सवात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला आपल्या होमपेजवर जुन्या आणि नव्या वर्षांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.
एखाद्या डिस्कोथेकमधील वातावरण असावे असा माहोल गुगलने आपल्या होमपेजवर निर्माण केला आहे. नववर्षांचे स्वागत करण्यासाठी गुगलने आपल्या होमपेजवर ‘२०१३’ हे आकडे ‘थर्टी फर्स्ट’संगीताच्या तालावर नाचून साजरा करीत आहेत. तर शेजारीच स्तब्ध उभा असलेला ‘चार’ हा आकडा ‘तीन’ या आकडय़ाची जागा घेण्यास अधीर झाला आहे. विविध रंगांच्या चौकानांनी सजलेल्या व्यासपीठावर हे आकडे संगीताच्या तालावर २०१३ फेर धरून नाचत आहे. तसेच गुगल नावाभोवती असणाऱ्या दोन ध्वनिक्षेपकांवर संगीत वाजत असल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे याशिवाय गुगल या शब्दातील एक ‘ओ’ हा डिस्कोबॉलचे काम करीत आहे. गुगलचा हा नववर्ष स्वागताचा जल्लोष जगातील अनेक राष्ट्रांमधील गुगलच्या वापरकर्त्यांना अनुभवता आला आहे.