सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे सोमवारी मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरला पब, बार आणि हॉटेल्स रात्रभर सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यामुळे मुंबईतील गिरगाव चौपाटी, कुलाबा, जुहू, शिवाजी पार्क येथे मुंबईकरांनी मनसोक्त मजा लुटली. देशाच्या अन्य भागांमध्येही जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी सोमवारी रजा घेतली होती किंवा अर्धा दिवसाची सुट्टी घेत घरी धाव घेतली. रात्री मुंबईतील किनारे गर्दीने खचाखच भरले होते. दरम्यान, नववर्षाचे स्वागत होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज होते. राज्यभरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत तब्बल ४० हजार पोलिसांचा पहारा होता.तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही सज्ज होते. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत. यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवून होते.

प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल  तर मध्य रेल्वेही चार विशेष लोकल चालविण्यात आल्या.

Story img Loader