दहशतवादी हल्ले चढवणे, अफगाणिस्तानातील नाटो सैन्यावर आत्मघातकी हल्ले करणे, महत्त्वाच्या व्यक्तींचे अपहरण करून खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घातपाती कारवाया करणाऱ्या तसेच जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हक्कानी नेटवर्कवर संयुक्त राष्ट्रांनी आर्थिक र्निबध लादले आहेत. तसेच त्यांचा आत्मघातकी हल्ल्यांचा प्रमुख कारी झकीर याच्यावरही र्निबध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील परिस्थितीची चांगली जाण असलेल्या भारतीय नेतृत्वाने ही संधी साधून हक्कानी नेटवर्कची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच परिषदेच्या अफगाणिस्तान-तालिबान र्निबध समितीने सोमवारी हक्कानी नेटवर्कवर आर्थिक र्निबध लागू केले. त्यामुळे आता हक्कानी नेटवर्कची विविध बँकांतील खाती गोठवणे, त्यांच्या नेत्यांच्या प्रवासावर र्निबध लादणे, तसेच शस्त्रखरेदीवर अंकुश ठेवणे आदी कारवाया केल्या जाणार आहेत.
हक्कानी नेटवर्कच्या आत्मघातकी हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार कारी झकीर याच्यावरही सुरक्षा परिषदेने आर्थिक र्निबध लादले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने अलीकडेच झकीर याची ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ अशी गणना केली आहे. त्यामुळेच त्याच्यावर ही बंधने लादण्यात आली आहेत.
कारी झकीर याने काबूल, तखार, कुंदुझ आणि बघलान या प्रांतातील कारवायांचे संचालन केले आहे. त्याच्याकडे परदेशी दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही होती. संयुक्त राष्ट्रांच्या र्निबधांमुळे त्याच्या कारवायांवर आता बंदी येण्याची शक्यता आहे.

Story img Loader