Harappan society is ‘Sindhu-Sarasvati civilisation’ शुक्रवारी, एनसीईआरटीच्या इयत्ता सहावीच्या समाजशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संदर्भांमुळे हे पुस्तक चर्चेत आहे. या पुस्तकात हडप्पा संस्कृतीचा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असा करण्यात आलेला आहे. शिवाय अनेक ठिकाणी सरस्वती नदीचा उल्लेख आहे. हडप्पा संस्कृतीच्या पतनासाठी सरस्वती नदी कोरडी पडल्याचे एक प्रमुख कारण असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.
‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड’ हे समाजशास्त्राचे एनडीए सरकारने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच हे पाठ्यपुस्तक शाळांमध्ये वापरले जाणार आहे. यापूर्वी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयांसाठी स्वतंत्र पुस्तक होती. परंतु नवीन अभ्यासक्रमात समाजशास्त्राचे एकच पुस्तक असणार आहे. या पुस्तकात स्पष्ट केले आहे की, समाजशास्त्रात अनेक उप-विषय असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. समाजशास्त्राचे नवीन पुस्तक विद्यार्थ्यांच्या सोयीकरता ‘इंडिया अँड द वर्ल्ड: लँड अँड पिपल; टेपेस्ट्री ऑफ द पास्ट’; ‘अवर कल्चर हेरिटेज अँड नॉलेज ट्रॅडीशन्स’; ‘गव्हर्नन्स अँड डेमोक्रसी’; ‘इकॉनामिक लाईफ अराउंड अस’ या पाच प्रमुख विषयांमध्ये विभागले आहे. या नवीन पाठ्यपुस्तकात सरस्वती नदीचे अनेक संदर्भ देण्यात आलेले आहेत. जुन्या पाठ्यपुस्तकात या नदीचा उल्लेख फक्त वैदिक सूक्तांमध्ये आलेले नदीचे एक नाव असा करण्यात आला होता.
अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?
नवीन पाठ्यपुस्तकात, ‘बिगिनिंग ऑफ इंडियन सिविलायझेशन’ या धड्यात सरस्वती नदीला प्रमुख स्थान मिळाले आहे. या अध्यायात हडप्पा संस्कृतीला ‘सिंधू-सरस्वती’ किंवा ‘सिंधू-सरस्वती’ संस्कृती म्हणून संबोधले आहे. इतकेच नाही तर हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहरे सरस्वती नदीच्या खोऱ्यात विकसित झाली, यात राखीगढ़ी आणि गणवेरीवाला यांसारख्या मोठ्या पुरातत्त्वीय स्थळांचा समावेश होता, असेही नमूद करण्यात आलेले आहे.
नवीन पाठ्यपुस्तकानुसार, “सरस्वती नदी आज भारतात ‘घग्गर’ आणि पाकिस्तानमध्ये ‘हाकरा’ (म्हणून ‘घग्गर-हाकरा नदी’) या नावाने ओळखली जाते”, आता ती हंगामी आहे असे म्हटले आहे. पुस्तकात दोन नकाशे देण्यात आलेले आहेत. एका नकाशात भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या नद्या दाखवण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या नकाशात ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’च्या मुख्य वसाहती सिंधू आणि तिच्या उपनद्यांसह दाखवल्या गेल्या आहेत.
अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?
या नवीन पाठ्यपुस्तकात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला याची कारणमीमांसा देताना दोन प्रमुख करणे देण्यात आली आहेत. एक म्हणजे वातावरणातील बदल, ज्यामुळे पावसावर परिणाम झाला, आणि पावसाचे प्रमाण कमी झाले. दुसरे म्हणजे सरस्वती नदी कोरडी पडली त्यामुळे या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली कालीबंगा किंवा बाणावली सारखी शहरे नामशेष झाल्याचे म्हटले आहे.
जुन्या पाठ्यपुस्तकात हडप्पा शहरांच्या ऱ्हासासाठी अनेक कारणं देण्यात आली होती. या कारणांपैकी सरस्वती नदी कोरडी पडल्याचा उल्लेख नाही. जुन्या पुस्तकात वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मतप्रवाहांचा संदर्भ देण्यात आला होता. काही अभ्यासकांच्या मते हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासासाठी आणि काही भागात पूर कारणीभूत होते. तर काहींनी राज्यकर्त्यांनी आपले नियंत्रण गमावल्यामुळे ही संस्कृती नष्ट झाल्याचे म्हटले आहे.