अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. हे प्रकरण उजेडात येताच या कंपनीतील अनेक आजी-माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या प्रमुखांवर अनेक आरोप केले आहेत. आता एका माजी कर्मचाऱ्यानेही ईमेल्सचे स्क्रीनशॉट पाठवून त्याच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आहे.
ईवायच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. तिची आई अनिता ऑगस्टिन यांनी याबाबत एक सविस्तर ई-मेल ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पाठविला होता. तो समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यात ॲनाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचबरोबर ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.
हेही वाचा >> पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीए अमित विजयवर्गिया यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट करून या कंपनीतील अंतर्गत कामकाजाची पोलखोल केली. त्यांनी म्हटलंय की, “कर्माची फळे मिळतातच हे आता सिद्ध झालं आहे.”
त्रास देऊन राजीनामा द्यायला लावला
“गेल्या वर्षी मला प्रचंड त्रास दिला गेला. मला EY India, मुंबई कार्यालयातील वरिष्ठ सल्लागार म्हणून माझ्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. माझ्याकडे काम करण्याची क्षमता आणि ज्ञान नसल्याचं सांगण्यात आलं. मी राजीव मेमाणी आणि रोहित अग्रवाल (भागीदार) यांना माझ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेल पाठवले होते. परंतु, त्यावर कोणीही उत्तरे दिली नाहीत”, असं अमित विजयवर्गिया यांनी म्हटलंय.
कोणीतरी मेल्यावर जागे होऊ नका
“मला आशा आहे की आता मलाही न्याय मिळेल आणि कोणीही स्त्री-पुरुष असा भेद करणार नाही. माझे प्रकरण कामगार विभागाकडे प्रलंबित आहे. कोणी मेल्यावर जागे होऊ नका. सक्रिय व्हा आणि कृती करा. राजीव मेमाणी तुमची टॅगलाइन अशी असावी : व्यवस्थापकांसोबत मिळून एक उत्तम स्मशानभूमी तयार करणे”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> Suicide Due to Work Pressure : कामाच्या अतिताणाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरची स्वतःला शॉक देऊन आत्महत्या!
माझी प्रमाणपत्रेही दिली जात नव्हती
अमित पुढे म्हणाले की, ईवाय व्यवस्थापनाने माझे अनुभव पत्र आणि रिलिव्हिंग लेटर आठ महिने दिलं नव्हतं. त्यामुळे दुबईतून कामाची ऑफर आलेल्या १६ कंपन्यांना मला नकार द्यावा लागला. या प्रमाणपत्रांसाठी मी त्यांना जवळपास ४०० मेल्स पाठवले होते. पण कोणीही रिप्लाय दिला नाही. अखेर मी याविरोधात फेब्रुवारी २०२४ मध्ये कामगार विभागात तक्रार केली. त्यानंतर त्यांनी माझे प्रमाणपत्रे दिली. परंतु, टॉप कंपन्यांमधून मला इवायने ब्लॉक करून टाकलं. त्यामुळे त्यानंतर मला एकाही कंपनीमधून ऑफर आली आहे.