गुजरातमधील मोबाइल इंटरनेट बंद; देशव्यापी जेलभरोचा इशारा
सरकारी नोकरी आणि शिक्षणात पटेल समाजाला आरक्षणाची मागणी करणारे नेते हार्दिक पटेल याला शनिवारी सुरत येथील वरच्छा भागात अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा त्याला जामीन देण्यात आला. अहमदाबादमध्ये पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात असून पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या भागांतही मोठा बंदोबस्त आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील मोबाइल इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. पटेल नवनिर्माण सेनेने मात्र हार्दिक याची सुटका न झाल्यास देशव्यापी जेलभरोची हाक दिली असून गुजरातमध्ये काही ठिकाणी रास्ता रोकोचे प्रयत्न झाले असले तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आमचे आंदोलन दडपून राज्यात हिंसाचार घडावा, हीच गुजरात पोलीस व सरकारची इच्छा आहे, असा आरोप हार्दिकने केला आहे.
हार्दिक पटेलने दांडी ते अहमदाबाद अशी यात्रा काढायची होती. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हार्दिकचे सहकारी व पाटिदार अनामत आंदोलन समितीचे सुरतमधील निमंत्रक अल्पेश कथिरिया यांनी एकता यात्रेची अचानक घोषणा केली. वरच्छा भागातून ही यात्रा निघताच, या यात्रेला परवानगी घेतली नसल्याचे सांगत पोलिसांनी हार्दिक यांच्यासह त्यांच्या ३५ समर्थकांना ताब्यात घेतले होते.
पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक यांनी अहमदाबाद येथे २५ ऑगस्टला मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांना अटक होताच राज्यभर उसळलेल्या हिंसाचारात दहा जण ठार झाले होते.
राज्यात अनेक ठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. सौराष्ट्रातील मोरबी येथे ३०० स्त्री-पुरुषांनी हार्दिक यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ‘रास्ता रोको’ केला. जामनगरच्या भावनगर आणि ध्रोल येथेही जमावाने काही काळ रस्ता अडवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमध्ये सभा घेण्यापासून रोखणार?
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल याच्या प्रत्येक हालचालीवर केंद्रीय गृह खात्याची नजर आहे. हार्दिकची पावले बिहारच्या दिशेने पडणार असल्याची कुणकुण लागताच केंद्रीय गृह खात्याच्या सूचनेवरून राज्य पोलिसांनी कारवाई केली आहे. बिहारमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात चार सभा घेण्याची घोषणा हार्दिकने केल्यानंतर भाजप नेत्यांचे धाबे दणाणले होते. हार्दिकचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी झालेल्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांच्यावरदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांची खप्पामर्जी झाली होती. हार्दिकच्या हालचालीवर खुद्द शहा लक्ष ठेवून आहेत.

सुरतमध्ये दगडफेक
हार्दिक पटेल याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ सकाळी अहिंसक मार्गने सुरू असलेल्या आंदोलनाला सायंकाळी हिंसक वळण लागले. सुरत शहरातील कपोदरा परिसरात दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. कपोदरा पोलीस ठाण्याजवळ मोठय़ा संख्येने जमाव जमला, आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-८ रोखला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik patel detained released on bail