गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आता आम आदमी पक्ष गुजरातमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषदेत यासंदर्भात घोषणा केली होती. केजरीवाल यांच्या गुजरात भेटीदरम्यान, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल आपमध्ये सामील होऊ शकतात अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. त्यावर हार्दिक पटेल यांनी अशा बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पटेल यांनी फेसबुकच्या माध्यमातून अशा बातम्यांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या बातम्या बनावट असल्याचे म्हणत हार्दिक पटेल यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला केला आहे.

अरविंद केजरीवाल यांची घोषणा! २०२२ मध्ये गुजरात विधानसभेच्या सर्व जागा ‘आप’ लढवणार

गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की करोना कालावधीत भाजप आपले अपयश लपविण्यासाठी बनावट बातम्या पेरत आहे. फेसबुकवर यासंदर्भात त्यांनी पोस्ट लिहिली आहे. विविध माध्यमांवर मी आम आदमी पक्षात सामील झाल्याची आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा चेहरा बनण्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. या बातम्या निराधार आणि खोट्या आहेत. काँग्रेस समर्थक, कामगार आणि पाटीदार समाजात संभ्रम पसरवण्याच्या उद्देशाने भाजपाकडून या बातम्या पेरण्यात आल्या आहेत असे म्हटले आहे.

हार्दिक यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “काँग्रेस पक्षाच्या १३० वर्षापेक्षा जास्त इतिहासात मी सर्वात कमी वयाचा कार्यकारी अध्यक्ष आहे. माझे काँग्रेसमध्ये सामील होण्याचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे शेतकरी विरोधी, गरीब विरोधी आणि पाटीदार विरोधी भाजपाला गुजरातमधील सत्तेतून काढून टाकणे. सन २०१४ नंतर देशातील आणि गुजरातमधील समाजातील सर्व घटकांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे,” असे हार्दिक यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा >> “काँग्रेसमध्ये आलो तेव्हा वाटलं होतं…”, २ वर्षांत हार्दिक पटेल काँग्रेसला वैतागले!

“कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण तयारीसह पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरुन २०२२ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकेल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देशातील अनेक सक्रिय तरुणांना पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे, त्यातील मी एक ज्वलंत उदाहरण आहे.”

काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल

हार्दिक पटेल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या कोणालाही भाजपाच्या कुशासनविरूद्ध लढा मजबूत करायचा असेल त्याचे गुजरातमध्ये स्वागत आहे. काँग्रेस हीच गेल्या विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापनेच्या अगदी जवळ आली होती. करोनाच्या गंभीर काळात शेजारच्या राजस्थान, महाराष्ट्रामधील काँग्रेस पक्षाची कामगिरी गुजरातमधील लोकांनी पाहिली आहे आणि मला खात्री आहे की २०२२ नंतर लोक आपल्याला पूर्ण बहुमताने राज्याची सेवा करण्याची संधी देतील.” यावरुन हार्दिक पटेल आपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik patel explanation on the news of joining aap information provided through facebook post abn