गुजरातमध्ये पटेल समाजाकडून काढण्यात येणाऱ्या एकता यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सुरत पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिक पटेलला ताब्यात घेतले. हार्दिक पटेलबरोबर पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) ७८ समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या अटकसत्रानंतर येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरतमधील मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. सोशल मिडीयावरील अफवांमुळे कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
पाटीदार समाजाच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी एकता यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचे कारण दाखवत पोलिसांनी यापूर्वीच एकता यात्रेसाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे संतापलेल्या हार्दिकने रविवारी कोणत्याही परिस्थितीत यात्रा काढण्याचा निश्चय केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हार्दिक पटेलला आज ताब्यात घेतले. दरम्यान, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी सुरतमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सुरत पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.