अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे केल्याने राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. सरदार पटेलांचं नाव हटवल्यावरुन गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध घातले होते, म्हणून आरएसएसचे चेले त्यांचं नाव हटवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी टिकास्त्र सोडलंय. सरदार पटेलांचा अपमान भारत सहन करणार नाही असा इशाराही हार्दिक पटेल यांनी दिला. “भारतरत्न, लोहपुरुष सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध घातले होते, म्हणून आरएसएसचे चेले त्यांचं नाव हटवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. मनातून द्वेष करायचा आणि तोंडावर मैत्री दाखवायची असंच वर्तन भाजपाचं सरदार पटेलांसोबत राहिलंय…पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरदार पटेलांचा अपमान हिंदूस्थान सहन करणार नाही”, अशा आशयाचं ट्विट हार्दिक यांनी केलं आहे. अजून एका ट्विटमध्ये “सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही”, असंही हार्दिक पटेल म्हणालेत.

आणखी वाचा- “हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”


दरम्यान, स्टेडियमच्या नावावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी तर थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” अशा शब्दात हल्लाबोल केलाय. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केलीये.

आणखी वाचा- “केंद्रीय मंत्र्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर सेमच मेसेज मिळाला होता का?”; मोदी स्टेडियमसंदर्भात जावडेकर, रिजीजू यांचे सेम टू सेम ट्विट

बुधवारी १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या भव्य मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. उद्घाटनावेळी अमित शाह यांनी हा मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यानेच देशाचे पंतप्रधान म्हणून स्टेडिअमला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik patel slams renaming of worlds largest cricket stadium says it is an insult to sardar patel sas