हार्दिक पटेल यांचे नितीशकुमार यांना समर्थन
बिहार विधानसभा निवडणुकीत आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाविरोधात गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचे प्रमुख ‘हिरो’ हार्दिक पटेल पाच सभा घेणार आहेत. दिल्लीतील पत्रकार परिषदेत गुजरात सरकारचा अत्यंत आक्रमक शब्दात समाचार घेणाऱ्या हार्दिक पटेल यांनी आमच्यावर अन्याय झाल्यास घरात घुसून (सरकारला) धडा शिकवू असा इशारा दिला. पाटीदार आंदोलनास हिंसक वळण लागले होते. त्यावर राज्य पोलिसांनीच आमच्या माताभगिनींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप हार्दिक यांनी केला. हार्दिक यांची पावले बिहारकडे वळणार असल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पटेल समुदाय समृद्ध असल्याच्या चर्चेत अर्थ नाही. केवळ पाच टक्के पटेल आर्थिकदृष्टय़ा समृद्ध आहे. त्यामुळे पटेलांना आरक्षण हवे आहे, असे हार्दिक म्हणाले. आरक्षणाचा पाया जातच असावी; आर्थिक आधार नव्हे, अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही बिहारमध्ये पाच सभा घेणार आहोत. अद्याप कुणाही राजकीय पक्षाला समर्थन दिलेले नाही.
आम्ही नितीशकुमार यांचे समर्थन करतो, परंतु जदयूला आमचा पाठिंबा नाही. नितीशकुमार कुर्मी अर्थात ओबीसी आहेत; त्यामुळे त्यांना पाठिंबा असल्याचे हार्दिक यांनी सांगितले. केवळ बिहारमध्ये सभा घेऊन थांबणार नाही.
पुढील महिन्यात दिल्लीच्या रामलीला मैदानावरदेखील पटेल समुदाय शक्तिप्रदर्शन करणार आहे. नितीशकुमार यांना आम्ही समर्थन दिले असले तरी जदयूला मत देण्याचे आवाहन करणार नसल्याचे हार्दिक यांनी स्पष्ट केले. गुजरातमधील दंगलीस पोलीस व राज्य सरकार जबाबदार आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करीत होतो. मात्र आमचा अपमान करण्यात आला. महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली गेली. त्यामुळे आंदोलक संतापले, असे हार्दिक म्हणाले.