गुजरातमधील प्रभावी पटेल समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी चेतवणाऱ्या हार्दिक पटेल याने हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून, गुर्जर समाजाचा आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याचाही निर्णय घेतला आहे.
पटेल समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे; आरक्षण व्यवस्था रद्द व्हावी हा नाही, असे सांगणाऱ्या हार्दिकने या मुद्दय़ावर कुठल्याही वाटाघाटी करण्याची शक्यता फेटाळून लावली.
केवळ २२ वर्षे वयाच्या आणि बी.कॉम.चा पदवीधर असलेल्या हार्दिकने २५ ऑगस्टला अहमदाबादेत विराट शक्तिप्रदर्शन करून जनजीवन ठप्प पाडले होते. यानंतर हिंसक वळण घेतलेले हे आंदोलन राज्यभर पसरले. आम्हाला यश मिळेपर्यंत हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे त्याने सांगितले.
पटेलांचा ओबीसी श्रेणीत समावेश झाला नाही, तर संपूर्ण आरक्षण व्यवस्था रद्द करण्यात यावी, असे हार्दिक पटेलने म्हटल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता, आम्ही आरक्षण व्यवस्था रद्द करण्यासाठी आंदोलन करत असल्याची चर्चा होत असली तरी तसे काही नाही. पटेल समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश केला जावा हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे त्याने सांगितले.
गुर्जर समाजाच्या ज्या नेत्यांनी गुजरातमध्ये त्यांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी आमची मदत घेतली, त्यांनी भेटण्यासाठी मी दिल्लीला जात आहे, असे हार्दिकने सांगितले.
आरक्षण आंदोलनाचे लोण राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार काय, असे विचारले असता, आत्ताच असे वक्तव्य करणे घाईचे होईल, परंतु काळ याचे उत्तर देईल, बघू काय होते ते, असे हार्दिक उत्तरला. आपली मागणी पूर्ण न झाल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ उगवणार नाही, असा इशारा त्याने यापूर्वीच दिला आहे. राजकारणात प्रवेश करणार काय, असे अल्पावधीतच पटेल समाजाचा तरुण लोकप्रिय नेता ठरलेल्या हार्दिक पटेलला विचारले असता त्याने उत्तर देणे टाळले. मी अद्याप याबाबत काही निर्णय घेतला नसून माझे संपूर्ण लक्ष सध्या पटेल आरक्षणाच्या आंदोलनाकडेच असल्याचे तो म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा