काही दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये पार पडलेल्या एका सभेमधला तपशील आता समोर येऊ लागला आहे. आयोजकांनी याला ‘धर्म संसद’ असं नाव दिलं होतं. या सभेमध्ये सहभागी झालेल्या वक्त्यांनी केलेली वादग्रस्त विधानं आणि भाषणांचे तपशील आता समोर येऊ लागले असून त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या सभेमध्ये दिल्ली भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय हे देखील उपस्थित होते. “मी त्या सभेमध्ये फक्त अर्ध्या तासासाठी व्यासपीठावर होतो. माझ्या आधी आणि नंतर कोण काय बोललं, यासाठी मी जबाबदार नाही”, असं अश्विनी उपाध्याय यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे. या सभेचा सविस्तर वृत्तांत इंडियन एक्स्प्रेसनं दिला आहे.
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये ही सभा पार पडली. या सभेसाठी देशभरातील मठ आणि मंदिरांचे प्रमुख सहभागी झाले होते. एकूण १५० सहभागी व्यक्तींमध्ये सुमारे ५० महामंडलेश्वर देखील होते अशी माहिती या सभेचे आयोजक आणि धार्मिक नेते नरसिंहानंद यांनी दिली आहे. या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून सध्या चर्चा सुरू झाली आहे.
“२०२९मध्ये मुस्लीम पंतप्रधान नको”
या सभेचा विषय २०२९मध्ये देशाचं पंतप्रधानपद मुस्लीम व्यक्तीकडे असेल, हा असल्याचं नरसिंहानंद यांनी सांगितलं. “२०२९मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी मुस्लीम व्यक्ती असेल, हाच या सभेचा विषय होता. हा कोणताही निराधार विचार नाही. ज्यांना लोकसंख्येचं गणित कळतं, त्यांना हे माहिती आहे. ज्या पद्धतीने मुस्लीम लोकसंख्या वाढतेय आणि आपली लोकसंख्या घटतेय, येत्या सात ते आठ वर्षांत रस्त्यांवरून फक्त मुस्लीमच फिरताना दिसतील”, असं नरसिंहानंद म्हणाले.
फक्त १० टक्के हिंदू राहतील..
दरम्यान, येत्या २० वर्षांत देशात फक्त १० टक्के हिंदू राहतील, असा दावा देखील नरसिंहानंद यांनी केला. “इस्लामचा इतिहास पाहाता पुढील २० वर्षांमध्ये ५० टक्के हिंदूंचं धर्मांतर झालेलं असेल आणि ४० टक्के हिंदूंची हत्या केली जाईल. फक्त १० टक्के हिंदू शिल्लक राहतील, जे अमेरिका, कॅनडा, लंडन आणि युरोप किंवा संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयाला असतील. कुठेही मठ, मंदिर नसतील”, असा वादग्रस्त दावा नरसिंहानंद यांनी केला आहे.
अधिक चांगली शस्त्रास्त्र हवीत
दरम्यान, या सभेत बोलताना त्यांनी आता अधिक चांगली शस्त्र हवीत, असं देखील म्हटलं आहे. “तलवारी विसरा, त्या फक्त शोकेसमध्ये ठेवल्या जातील. आता अधिक चांगल्या शस्त्रांनी लढा दिला जाईल. फक्त चांगली शस्त्रच तुम्हाला वाचवू शकतील. शास्त्रमेव जयते”, असं नरसिंहानंद आपल्या भाषणात म्हणाले आहेत.