उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा आरोप
काँग्रेसच्या आमदारांना व नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत असून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, तसेच मंगळवारी होणाऱ्या शक्तिपरीक्षणापूर्वी त्यांचे दूरध्वनी टॅप केले जात असल्याचा आरोप उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केला आहे. दरम्यान, रावत हे घोडेबाजार करत असल्याचे दाखवणाऱ्या ‘स्टिंग ऑपरेशन’चा आणखी एक व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
आपण नातेवाईक, हितचिंतक किंवा ओळखीचे असल्याचे भासवणाऱ्या संदेशवाहकांकडून आमचे आमदार व नेते यांना धमकीचे संदेश मिळत असून मी जणूकाही राष्ट्रविरोधी असल्यासारखी माझ्यावरही पाळत ठेवली जात आहे, असे रावत यांनी पत्रकारांना सांगितले.
माझे, माझ्या नातेवाईकांचे आणि समर्थकांचे दूरध्वनी टॅप केले जात आहेत, तसेच केंद्रीय संस्था काँग्रेसच्या लोकांना निरनिराळ्या मार्गाने त्रास देत आहेत, असा आरोप रावत यांनी केला. केंद्रीय यंत्रणांचा खुलेआम दुरुपयोग केला जात असून केवळ आमचे आमदारच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही धमकावले जात आहे असे ते म्हणाले.
रावत हे घोडेबाजार करत असल्याचे दाखवणाऱ्या ‘स्टिंग ऑपरेशन’चा आणखी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्यानंतर रावत यांनी हे आरोप केले आहेत. या व्हिडीओबद्दल विचारले असता, आपल्याला अद्याप त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० मे रोजी होत असलेला विश्वासदर्शक ठराव आपण जिंकू, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला.
लोकशाही मार्गाने निवडून आलेले आपले सरकार पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री व बंडखोर नेते विजय बहुगुणा व त्यांचे पुत्र साकेत यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्याशी हातमिळवणी केली असल्याचाही आरोप रावत यांनी केला.

Story img Loader