Harish Salve On Delhi HC Judge: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी काल मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली होती. त्यानंतर, न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या कॉलेजियम प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी आहेत, अशी टीका सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी केली आहे.

तुघलक रस्त्यावरील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर त्यांच्या अधिकृत बंगल्यातून हे पैसे जप्त करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा शहरात नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन केला केल्यानंतर घटनास्थळी प्रथम पोहचलेल्या व्यक्तीने एका खोलीत मोठी रक्कम असल्याचे सांगितले, त्यानंतर न्यायाधीशांविरुद्ध चौकशी सुरू झाली.

हरीश साळवे या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले की, “जर आरोप खरे असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करणे आवश्यक मानले असेल, तर यामुळे माझ्यासारख्या कॉलेजियम प्रणालीचे टीकाकार नेहमीच म्हणत आलेले मुद्दे सिद्ध झाले आहेत, की ही प्रणाली अयोग्य आहे.” साळवे यांनी सीएनएन-न्यूज१८ शी बोलताना हे विधान केले आहे.

कॉलेजियम प्रणालीमध्ये त्रुटी

न्यायाधील यशवंत शर्मा यांच्यावर आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने वर्मा यांची आलाहबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना साळवे म्हणाले, “या कॉलेजियम प्रणालीमध्ये खूप त्रुटी आहेत. जर हे पैसे दुसऱ्याच्या घरात सापडले असते तर ईडी तुमच्या दारात आली असती. जर हे पैसे गृहसचिव, वित्त सचिवांच्या घरी सापडले असते तर त्यांची दुसऱ्या विभागात बदली केली असती का? त्यांना निलंबित केले गेले असते. एका न्यायाधीशाला एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात हलवणे हे सोयीचे आहे आणि चुकीचे आहे.”

न्यायपालिकाच खटल्याच्या फेऱ्यात

“मी नेहमीच कॉलेजियमचा टीकाकार आहे. ही एक स्टॉप-गॅप व्यवस्था आहे. ही व्यवस्था पारदर्शकतेने चालली पाहिजे आणि कॉलेजियम अशा प्रकारे काम करू शकत नाही,” असे साळवे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “या प्रकरणामुळे आता न्यायपालिकाच खटल्याच्या फेऱ्यात अडकली आहे. या तपासात न्यायाधीशांचे वर्चस्व असलेले पॅनेल असू नेय. यासाठी अंतर्गत चौकशी पुरेशी नाही.”

देवच या देशाचे रक्षण करो

दुसऱ्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने “छातीला स्पर्श करून पायजम्याची नाडी खेचणं हा बलात्काराचा गुन्हा नाही” असे निरीक्षण नोंदवले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी टीका केली होते.

“उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात, छाती पकडून पायजम्याची नाडी खेचणं बलात्काराचा गुन्हा नाही. खंडपीठात काम करणाऱ्या अशा न्यायाधीशांपासून देवच या देशाचे रक्षण करो. अशा न्यायाधीशांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय खूपच मवाळ आहे,” असे सिब्बल यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Live Updates

Story img Loader