Trump Zelensky Fight Memes On Social Media: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

यानंतर आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या प्रकाराची बॉलिवूडशी तुलना केली आहे. गोएंका यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नाना पाटेकर अभिनित १९९५ च्या हिंदी चित्रपट ‘हम दोनो’ मधील एक क्लिप शेअर केली आहे, ज्यावरून त्यांनी असे सूचित केले की दोन्ही नेत्यांमधील तणावपूर्ण संवाद “बॉलिवूडला अपेक्षित होता.”

गोएंका यांनी शेअर केलेली हम दोनो चित्रपटातील सीन हा ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यातील संघर्ष उत्तम प्रकारे टिपतो, ज्यामध्ये ऋषी कपूर यांना “ट्रम्प” असल्याचे तर “झेलेन्स्की” नाना पाटेकर असल्याचे दाखवले आहे.

या क्लिपमध्ये ऋषी कपूर यांची व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांच्या व्यक्तिरेखेला म्हणते, “मी तुमचा नोकर नाही, तुमच्या वडिलांचा नोकर नाही.” तेव्हा नाना पाटेकर यांची व्यक्तीरेखा, “तुमची भाषा सांभाळा”, असे उत्तर देते. यावर ऋषी कपूर नाना पाटेकरांना गप्प करतात आणि म्हणतात, “शांत राहा. अडचण तुमची आहे. तुम्हाला पैशांची गरज आहे. योग्य पद्धतीने विनंती करा. मदत मागण्याचा हा मार्ग आहे का?”

शुक्रवारी झालेल्या बैठकीत तणाव वाढल्यानंतर, निराश झालेल्या ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशी वाटाघाटी करणे कठीण होत चालले आहे असे म्हटले. काही तासांनंतर, ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जोपर्यंत अमेरिकेचा सहभाग असेल तोपर्यंत झेलेन्स्की शांततेसाठी तयार होणार नाहीत. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेचा अनादर केल्याचा आरोप केला आणि म्हटले की झेलेन्स्की जेव्हा खरोखर वाटाघाटीसाठी तयार असतील तेव्हाच त्यांनी अमेरिकेकडे यावे.

जागतिक नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील बाचाबाचीनंतर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांनी युक्रेनला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटले की, “न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या संघर्षात आम्ही युक्रेनच्या पाठीशी आहोत.” द गार्डियनच्या वृत्तानुसार, स्वीडनही युक्रेनच्या पाठीशी उभा आहे. अशाच भावना स्वीडिश पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनीही व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader