लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी तर, उपाध्यक्षपदी केतन पटेल यांची बिनविरोध निवड झाली. हर्षवर्धन यांच्या नियुक्तीमुळे पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच साखर महासंघावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
दिल्ली येथे शुक्रवारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थित झालेल्या सभेमध्ये १२ नव्या संचालकांची निवड करण्यात आली. पाटील व पटेल यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुतिन यांचे विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगात मृत्यू
राज्यात हर्षवर्धन पाटील यांनी सहकारमंत्रीपद भूषवले होते. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना सहकारी क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल तसेच, राज्यातील साखर उद्योगालाही चालना मिळेल असे मानले जात आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सध्या पक्षाने कोणतेही महत्त्वाची जबाबदारी दिलेली नाही. मात्र, राज्याच्या सहकारविषयक प्रश्नांचा हर्षवर्धन पाटील दिल्लीमध्ये पाठपुरावा करत असतात. राज्यातून दिल्लीत येणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळात हर्षवर्धन पाटील यांचा समावेश असतो. बारामती लोकसभा मतदारसंघही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने तिथेही हर्षवर्धन पाटील यांची संधी हुकली. त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद देऊन भाजपने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय स्तरावर सक्रिय केले असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>>काँग्रेसची बँक खाती गोठवली; प्राप्तिकर विभागाची कारवाई, लवादात धाव घेतल्यानंतर दिलासा
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघावर शरद पवार यांच्या गटाने कित्येक वर्षे वर्चस्व राहिले आहे. अजित पवार गटात सामील झालेले दिलीप वळसे-पाटील साखर महासंघाचे अध्यक्ष होते. दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व साखर संघांची शिखर संस्था असून साखर कारखाने व केंद्र सरकार यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करते.
साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड होताच हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. नवे सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची धुरा अमित शहा यांच्याकडे सोपवल्यापासून देशभरातील संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. केवळ २७ महिन्यांत ५४ नवे निर्णय घेण्याचा विक्रम नव्या सहकार मंत्रालयाने घेतला, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.