माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, असा खुलासा ‘एम्स’ प्रशासनातर्फे बुधवारी दुपारी करण्यात आला.
सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी बड्या अधिकाऱयांकडून दबाव होता, असा आरोप डॉ. गुप्ता यांनी केला होता. तो एम्सने फेटाळला. दरम्यान, आपल्या पत्नीच्या मृत्यूची सखोल आणि पारदर्शकपणे चौकशी केली जावी, अशी मागणी आपण पहिल्यापासूनच करीत होतो, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. फेसबुकवरील आपल्या पेजवर शशी थरूर यांनी यासंदर्भात आपली बाजू मांडली. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेले गूढ पूर्णपणे दूर करून तपासाचा योग्य शेवट करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास करणाऱयांना आपण संपूर्ण सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनंदा यांचे शवविच्छेदन करणाऱया डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख असलेल्या डॉ. सुधीर गुप्ता यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलला (कॅट) पत्र लिहीले आहे. यामध्ये गुप्ता यांनी सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी बड्या अधिकाऱयांकडून आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणला गेला असल्याचे म्हटले आहे. गुप्ता यांच्या खळबळजनक पत्रामुळे सुनंदा पुष्कर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
गुप्ता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, “सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालात बदल करण्याच्या बड्या अधिकाऱयांच्या आणि राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता काम केल्याने अहवाल सादर करण्याच्या नेमक्या तीन दिवस आधी काँग्रेस सरकारला माझ्या विभागात एक नवा प्रमुख नेमण्याचे सुचले आणि मी याविरोधात ‘कॅट’कडे आक्षेपही नोंदविला.” त्यानुसार नवा प्रमुख नेमण्याला ‘कॅट’ने स्थगितीही दिली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
या सर्व प्रकरणावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब-कल्याण मंत्री हर्षवर्धन म्हणाले, “मी मंत्री झाल्यानंतर डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्रमोशनसाठी मला पत्र लिहिले होते. आता टेलिव्हिजनवरील बातम्या पाहून सुधीर गुप्ता यांनी काही खळबळजनक आरोप केल्याचे मला समजले आहे. यापार्श्वभूमीवर ‘एम्स’च्या संचालकांना या प्रकरणावर सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे.”

Story img Loader