जगात केवळ आमचाच पक्ष प्रामाणिक असून, बाकीचे सगळेच भ्रष्ट आहेत, असे वाटणाऱया आम आदमी पक्षाला कॉंग्रेससोबत आघाडी करायला काहीच वाटत नाही, या शब्दांत दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉ. हर्ष वर्धन यांनी गुरुवारी आम आदमी पक्षावर टीका केली. आम आदमी पक्षाला आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष शुक्रवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर त्यावरील चर्चेमध्ये भाग घेताना हर्ष वर्धन यांनी आम आदमी पक्षावर टीका केली.
हर्ष वर्धन म्हणाले, दिल्लीतील जनतेने देशातील सर्वाधिक प्रामाणिक पक्ष भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा दिल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांनुसार कॉंग्रेसच्या नेत्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. कॉंग्रेसने सरकारला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांना कोणतीही सूट दिली जाऊ नये.
केजरीवाल दिल्लीकरांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही हर्ष वर्धन यांनी केला. ‘आप’च्या शपथविधी सोहळ्यासाठी रामलीला मैदानावर ४००० पोलीसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. शपथविधी सोहळ्यासाठी कमीत कमी सुरक्षा ठेवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले असतानाही त्या दिवशी मोठी सुरक्षा ठेवण्यात आली होती. शपथविधीसाठी मेट्रोमधून प्रवास करीत येणे, ही राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader