हरयाणातील चंदिगडमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चंदिगडमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणीचा तीन तरुणांनी पाठलाग केल्याची घटना घडली. तरुणांनी पीडित तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र तरुणीने प्रसंगावधान दाखवत स्वत:ची सुटका केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून चंदिगडमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याचा मित्र आशीषकुमार या दोघांनी कारमधून एका तरुणीचा पाठलाग केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी विकास आणि त्याच्या मित्राला अटक झाली असली तरी राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ही घटना ताजी असतानाच आता दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीचा तीन तरुणांनी पाठलाग केल्याचे उघड झाले.

चंदिगडमधील खासगी कंपनीत काम करणारी तरुणी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरुन जात होती. यादरम्यान कारमधून आलेल्या तिघांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. सेक्टर ३६ जवळ ही घटना घडली. घाबरलेल्या तरुणीने दुचाकीचा वेग वाढवला. मात्र त्यानंतरही तरुणांनी तिचा पाठलाग सुरुच ठेवला. सेक्टर ४० पर्यंत त्यांनी पाठलाग केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले. पाठलाग सुरु असताना यातील एका तरुणाने कारबाहेर येऊन तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला. शेवटी घरी पोहोचल्यावर पीडित तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडितेच्या घरी जाऊन तिचा जबाब घेतला आहे. तीन अज्ञात तरुणांविरोधात पाठलाग करणे आणि छेड काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारचा नंबर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader