BJP Leader Mohan Lal Badoli: हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल उर्फ जय भगवान यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील तक्रारदार तरुणीने तिच्यावर हिमाचल प्रदेशमध्ये बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. यानंतर हिमाचल प्रदेश पोलिसांनी दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल केला. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील कसौली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जुलै २०२३ रोजी हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या रॉस कॉमन हॉटेलमध्ये गुन्हा घडला, असे तक्रारीत म्हटले आहे. आज या एफआयआरची कॉपी आरोपींच्या फोन नंबर आणि पत्त्यासह व्हायरल झाली.

पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले की, ती दिल्लीत नोकरी करत असून ३ जुलै २०२३ रोजी ती एका मित्रासह हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला आली होती. तेव्हा हॉटेलमध्ये सदर गुन्हा घडला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी स्वरुपाची धमकी) असे गुन्हे दाखल केले आहेत.

तरुणीने तक्रारीत म्हटले की, ती तिच्या मित्रासह एका राजकारण्याला भेटली. ज्याचे नाव मोहनलाल बडोली असे होते. तर दुसऱ्याचे नाव रॉकी मित्तल होते. रॉकी मित्तलने मला सांगितले की, मला तो एका अल्बममध्ये प्रमुख भूमिकेसाठी घेणार आहे. तर मोहनलाल बडोली यांनी मला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. राजकारणात त्यांची वरपर्यंत ओळख असून त्यांनी मला नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आम्हाला मद्य पिण्याचीही ऑफर दिली, मात्र मी ती नाकारली.

“आम्ही वारंवार नकार देत असतानाही त्यांनी आम्हाला मद्य पिण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी माझ्याशी गैरव्यवहार करण्यास सुरुवात केली. मी त्यांचा विरोध करताच त्यांनी मला आणि मित्राला धमकावले. जर आम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले नाही, तर आम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच त्यांनी दिली. त्यानंतर दोघांनीही माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच त्यांनी माझे नग्न फोटो आणि व्हिडीओही काढले”, अशी माहिती पीडित तरुणीने तक्रारीत दिली आहे.

मोहनलाल बडोली काय म्हणाले?

बडोली यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून सदर तक्रार बिनबुडाची असल्याचे म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले, “हे सर्व बिनबुडाचे आरोप आहेत. असे काहीही झालेले नाही. याबद्दल मला जराही कल्पना नाही. हा एफआयआरही खोटा असल्याचा माझा संशय आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे असे बोगस एफआयआर बनवून कुणीतरी व्हायरल केले असावे.”

Story img Loader