चंडिगड: विधानसभा निवडणुकीपाठोपाठ हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बुधवारी भाजपने बाजी मारली. राज्यातील दहा पैकी नऊ महापौरपदे पक्षाने पटकावली. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत काँग्रेसला येथेही धक्का बसला. यापूर्वी भाजपकडे सात महापौरपदे होती.

काँग्रेसला एकाही ठिकाणी यश मिळाले नाही. सोनीपत येथे काँग्रेसचा महापौर होता. तेथेही त्यांचा पराभव झाला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपिंदरसिंह हुडा यांचे प्रभावक्षेत्र मानले जात असलेल्या रोहटकमध्येही भाजपने बाजी मारली. याखेरीज अंबाला, गुरुग्राम, फरिदाबाद, हिस्सार, आणि कर्नाल येथे महापौरपदासाठी भाजपने बाजी मारली. काँग्रेस उमेदवारांचा त्यांनी पराभव केला. महापालिकांसाठी दोन मार्च रोजी मतदान झाले. मनेसर येथे इंद्रजित यादव या अपक्षाने बाजी मारली.

राज्य सरकारच्या धोरणांवर जनतेने या निकालाने शिक्कामोर्तब केले. अधिक गतीने विकास करण्याची आमची जबाबदारी आहे.

नायबसिंह सैनी, मुख्यमंत्री, हरियाणा

Story img Loader