ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर येत असतानाच आता हरयाणा सरकारने स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे असे निर्देश हरयाणामधील बाल संरक्षण समितीने दिले आहेत. तसेच शाळेत ‘विचित्र’ वर्तन असलेल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे असे समितीने म्हटले आहे.
भारतात ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घडल्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर हरयाणामधील बाल संरक्षण समितीने शाळांना एक पत्रक पाठवले आहे. सर्व खासगी आणि सरकारी शाळांमधील ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे ब्लू व्हेल गेमविरोधात समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या गेममुळे होणारे नुकसान आणि धोक्यांविषयी मुलांना माहिती द्यावी असे निर्देश समितीने दिले आहेत. तसेच या गेममुळे होणारे नकारात्मक परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी असे समितीने नमूद केले आले आहे.
ब्लू व्हेल हा ५० दिवसांचा गेम असून यात दररोज एक आव्हान दिले जाते. यात शेवटचे आव्हान हे आत्महत्येचे असते. विशेष म्हणजे प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यावर स्पर्धकाला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पाठवावा लागतो. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन मंच वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. मुंबईतील पवई येथे एका विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केली आणि या गेमवर बंदी टाकण्याची मागणी जोर धरु लागली. गेल्या मंगळवारी केंद्र सरकारने ब्लू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश फेसबुक, गूगल, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला दिले होते. तर दिल्ली हायकोर्टानेही या गेमप्रकरणी सरकारला नोटीस बजावली आहे.