हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी विद्यार्थ्यांसाठी नविन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करणाऱ्या आणि झाडांची काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. ही योजना राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिरिक्त गुणांसाठीच्या तरतुदीचा मसुदा लवकरच तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचकुला जिल्ह्यातील मोरनी हिल्समध्ये असलेल्या ‘नेचर कॅम्प थापली येथे पंचकर्म आरोग्य केंद्राच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लाइडिंग आणि वॉटर स्कूटर यासारख्या रोमांचक खेळांमध्ये भाग घेतला. “नवीन धोरणाअंतर्गत हरियाणामध्ये ऑक्सी-वन ही संकल्पना पुढे नेण्यासाठी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रोपांची देखभाल व संगोपन करण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येतील”, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

“आजूबाजूच्या भागातील तरुणांना पॅराग्लाइडिंगचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या उपक्रम राबविण्यासाठी क्लबची निर्मिती करण्यात येईल. दिग्गज खेळाडू मिल्खा सिंग यांचे नाव या क्लबचे नाव दिले जाईल” असे खट्टर यांनी सांगितले.

पंचकुला व त्याच्या आसपासच्या भागांच्या एकत्रित विकास आराखड्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि पंचकुला देशातील सर्वात विकसित शहर होण्यास मदत होईल. पंचकुला एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत मोरनी हिल्समध्ये वनविभागाने अकरा नैसर्गिक रस्ते तयार केले आहेत. स्थानिक तरुण मार्गदर्शक म्हणून काम करतील आणि तेथील पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि परंपरा आणि त्या परिसरातील वनस्पती आणि वनस्पती याबद्दल समजावून सांगतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया, हरियाणा विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, पर्यटनमंत्री कंवर पाल आदी नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की पूर्वी लोकांना रोमांचक खेळांचा आनंद घेण्यासाठी मनाली व इतर ठिकाणी खूप दूर जावे लागत असे. शिवालिक टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर मोरनी हिल्सच्या क्षेत्रात अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरूवात करून लोकांना या रोमांचकारी खेळात सहभागी होण्याची संधीच मिळणार नाही तर त्यामुळे आजूबाजूच्या परिसराचा आर्थिक विकास होईल.” असे मनोहर लाल खट्टर म्हणाले. पंचकुला येथे पर्यटन माहिती केंद्र आणि यात्री निवास स्थापन करण्यात येणार आहे. पंचकुला येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पाच बसची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana cm manohar lal khattar says extra marks for class 8 to 12 students nurturing plant saplings abn