लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणातील सत्ताधारी भाजपा व जेजेपी यांच्यातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत थेट मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या राजीनाम्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील लोकसभा निवडणूक जागावाटप कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.
मनोहर लाल खट्टर व त्यांच्या मंत्र्यांनी आज सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे हरियाणा मंत्रीमंडळाचा विस्तार बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय जनता पक्ष व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीचं जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे.
मंत्रीमंडळात मोठे फेरबदल?
दरम्यान, हरियाणातील आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होणार, अशी चर्चा आहे. यामध्ये जेजेपी पक्षाच्या एकाही आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नसून भाजपा अपक्ष आमदारांचा सरकारसाठी पाठिंबा घेऊ शकते. त्यासाठी काही अपक्षांना मंत्रीपदही दिलं जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपाचा तिढा!
दरम्यान, भाजपा व जेजेपी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकासाठीच्या जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला होता. यासंदर्भात जेजेपी नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली असता त्यावेळी त्यांना हरियाणामध्ये एकही जागा दिली जाणार नसल्याचं सांगण्याच आल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जेजेपीची दोन जागांची मागणी असताना भाजपानं मात्र सर्व १० जागा लढवण्याची तयारी केली आहे.
जेजेपीला हरियाणातील हिसार व भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघ हवे होते. मात्र, भाजपानं सर्व जागा लढवणार असल्याचं पक्षातील वरीष्ठांना कळवलं आहे. तसेच, संभाव्य उमेदवारांची यादीही भाजपाकडून तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हरियाणा विधानसभेतील पक्षीय बलाबल
हरियाणा विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपा व जेजेपीनं आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा पार करण्यात अपयश आल्यामुळे जेजेपीशी आघाडी करून हरियाणात भाजपाप्रणीत सरकार अस्तित्वात आलं. हरियाणा विधानसभेत भाजपाकडे ४१, जेजेपीकडे १०, काँग्रेसकडे ३०, अपक्ष ७, इंडियन नॅशनल लोक दल व हरियाणा लोकहित पार्टी यांच्याकडे प्रत्येकी एक आमदार असं पक्षीय बलाबल आहे.