भाजपच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कथित लाठीमारात सुमारे १० जण जखमी झाले. याच प्रकरणानंतर कर्नालचे उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात त्यांनी पोलिसांना विरोध करणाऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश दिल्याचं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सिन्हा यांच्यासहीत हरियाणा सरकारवर फार टीका झाली. मात्र आता याचसंदर्भात बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मात्र अप्रत्यक्षपणे या अधिकाऱ्याच्या पाठिशी असल्याचे संकेत दिले.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते ज्या बैठकीत हजर होते त्याचबैठकीसंदर्भातील आंदोलनामध्ये हा प्रकार घडला. राज्य पोलिसांच्या शेतकऱ्यांविरोधातील या कारवाईवर अनेकांनी टीका केली आणि तिच्या निषेधार्थ निरनिराळ्या ठिकाणी अनेक रस्ते रोखून धरण्यात आले होते. यावेळी झालेल्या लाठीचार्जसंदर्भात बोलताना खट्टर यांना सिन्हा यांच्या व्हायरल व्हिडीओसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “अधिकाऱ्याने चुकीचे शब्द वापरले. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. त्या अधिकाऱ्याने ते शब्द बोलायला नको होते. मात्र त्यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर भूमिका घेणं गरजेचं होतं,” असं मत खट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उप न्यायदंडाधिकारी आयुष हे पोलिसांना शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आदेशही देत ​​आहेत. आयुष अनेक पोलिसांसमोर उभे राहून हे आदेश देत आहेत आणि त्यांना सूचना देत आहे. “हे अगदी स्पष्ट आहे, तो कोणीही असो, कुठलाही असो त्याला जाऊ देऊ नका. येथून कोणालाही पुढे जाऊ देऊ नका. आपली काठी उचला आणि जोरात मारा. कोणत्याही अतिरिक्त सूचनांची आवश्यकता नाही, फक्त जोरात मारायचे आहे. जर मला इथे एकही आंदोलक दिसला तर त्याचे डोके फुटलेलं पाहिजे. काही शंका आहे का?”, अशा शब्दात सिन्हा पोलिसांना सूचनका करताना दिसतात.

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची बातमी ऐकल्यानंतर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पोहोचून रस्ता रोको केला होता. दिल्ली आणि चंदीगडला जोडणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, भाजपा नेते वरुण गांधी यांनीही तो शेअर केला आणि म्हटले, “मला आशा आहे की हा व्हिडिओ एडिट केला गेला असेल आणि उप न्यायदंडाधिकाऱ्याने तसे म्हटले नाही … अन्यथा लोकशाही असलेल्या भारतात आमच्या नागरिकांसोबत असे करणे अस्वीकार्य आहे.”

कर्नाल येथे निदर्शने करत असलेल्या शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा काँग्रेसने निषेध केला असून, हरियाणातील भाजपा-जेजेपी राजवटीची तुलना ‘जनरल डायर सरकारशी’ केली आहे. या लाठीमारानंतर रक्तबंबाळ कपड्यांसह एका शेतकऱ्याचे छायाचित्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर टाकले. ‘पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे रक्त सांडले असून, भारताची मान लाजेने झुकली आहे’, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या हल्ल्याचा निषेध करताना भाजपा- जेजेपी सरकारचे वर्णन ‘जनरल डायरचे सरकार’ असे केले आहे.

Story img Loader