Himani Narwal Case : काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याची धक्कादायक घटना हरियाणा राज्यातील रोहतकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे हरियाणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता पोलीस तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. दरम्यान, हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या प्रकरणाबाबत हिमानी नरवाल यांच्या आई सविता नरवाल यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच मुलीच्या हत्येच्या घटनेबाबत गंभीर आरोप केला आहे. “पक्षातील काही लोक या हत्येत सामील असू शकतात”, असा आरोप सविता नरवाल यांनी केला आहे.
सविता नरवाल यांनी काय आरोप केला?
“माझ्या मुलीने काँग्रेससाठी खूप त्याग केला. काँग्रेस पक्षाचे सदस्य आमच्या घरी यायचे. पक्षातील काही लोक या हत्येत सहभागी असू शकतात. कारण हिमानीच्या वाढत्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना धोका वाटला असावा. २७ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलीशी शेवटचं बोलणं झालं. तसेच हिमानी एका दिवसानंतर भूपिंदर सिंग हुडा यांच्या रॅलीत सहभागी होणार होती. मात्र, दुसऱ्या दिवशी हिमानीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद होता. गेल्या १० वर्षांपासून हिमानी काँग्रेसबरोबर काम करत होती. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर हिमानीने सहभाग घेतला होता. तिला स्वच्छ राजकारण करायचं होतं. पण काही लोक तिला अडचणीत अडकवू इच्छित होते”, असा गंभीर आरोप सविता नरवाल यांनी इंडिया टुडेशी बोलताना केला आहे.
“माझी मुलगी अनेकदा पक्षातील समस्यांबाबत देखील बोलत होती आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी तिचा वादही व्हायचा. जर तिला एखाद्या गोष्टीत तडजोड करावी लागेल असं कोणी सांगितलं तर माझी मुलगी ठोस भूमिका घ्यायची. जे चुकीचं आहे ते चुकीचं आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे अशी भूमिका घ्यायची. आता मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्याने कुटुंबाशी अद्याप संपर्क साधला नाही किंवा भेटही घेतली नाही. काँग्रेसचा कोणताही नेता अद्याप आमच्याशी बोलला नाही”, असंही सविता नरवाल यांनी म्हटलं. तसेच मुलीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही सविता नरवाल यांनी केली.
नेमकं घटना काय घडली?
हरियाणातील रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाने निळ्या रंगाच्या सुटकेसकडे पाहिलं. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली होती. याबाबत काहीसा संशय आल्याने तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. या युवतीचा मृतदेह पाहून गळा दाबून तिला ठार करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं. त्यानंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा असल्याची माहिती समोर आली.