Haryana DGP Shatrujeet Kapoor On Lawrence Bishnoi : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हे नाव चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही लॉरेन्स बिष्णोई हे नाव चर्चेत आलं होतं. तसेच प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातही लॉरेन्स बिष्णोई हे नाव चर्चेत आलं होतं. दरम्यान, या प्रकरणी लॉरेन्स बिष्णोई टोळीने समाजमाध्यमांवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा चर्चेत असून तो मागील काही वर्षांपासून तुरुंगात आहे. मात्र, तुरुंगात असूनही लॉरेन्स बिश्नोई हा टोळी कशी चालवतो? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. मात्र, तुरुंगात असून देखील लॉरेन्स बिश्नोई अनेक धक्कादायक गोष्टी घडवून आणत असल्याचं सांगितलं जातं. देशभरात विविध ठिकाणी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईबाबत हरियाणाच्या डीजीपींनी मोठं विधान करत कारवाईचा इशारा दिला आहे. “गुन्हेगार तो गुन्हेगारच, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असं डीजीपी शत्रुजीत कपूर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
हरियाणाचे डीजीपी शत्रुजित कपूर यांनी सोमवारी पंचकुलामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डीजीपी शत्रुजीत कपूर यांनी म्हटलं की, “बाबा सिद्दीकी खून प्रकरण असो किंवा अन्य खून प्रकरण. अशा प्रकारचे प्रकरण कुठेही घडले तरी त्या ठिकाणचे पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात, ते एका शहराचे किंवा एका ठिकाणचे नसतात. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असं डीजीपी शत्रुजित कपूर यांनी म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात १० जणांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. २० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या प्रकरणात एका भंगार विक्रेत्याला अटक केली. हा आरोपी शूटर्सना शस्त्र पुरवायचा असा आरोप त्याच्यावर आहे. भगवंत सिंग (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंगच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत.