Haryana Election 2024 Vinesh Phogat, Bajrang Punia : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया व महिला कुस्तीपटू विनेश फोगट या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विनेशला काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीचं तिकिट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर बजरंगलाही उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विनेश फोगटची जवळची मैत्रीण व ऑलिम्पिक पदकविजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने विनेश व बजरंग यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी विनेश व बजरंगच्या राजकारणातील प्रवेशावर टीका केली आहे. ते म्हणाले, “काँग्रेसने त्यांच्या राजकारणासाठी आमच्या लेकींचा वापर केला. काँग्रेसने आमच्या लेकींच्या स्वाभिमानावर हल्ला केला. माझ्यावर त्या लोकांनी जे काही आरोप केले, ते करत असताना हे लोक ज्या दिवसाचा उल्लेख करत आहेत त्या दिवशी मी दिल्लीत नव्हतो”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बृजभूषण शरण सिंह म्हणले, “तुम्ही माध्यमं ज्या आंदोलनाबाबत बोलता, माझ्यावर टीका करता ते आंदोलन मुळात खेळाडूंचं आंदोलन नव्हतं. ते काँग्रेसचं आंदोलन होतं. विनेश-बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की काँग्रेसने माझ्याविरोधात षडयंत्र रचलं होतं. मला हरियाणाच्या जनतेला सांगायचं आहे की बजरंग आणि विनेशने मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन केलं नव्हतं. त्यांनी केवळ त्यांच्या व काँग्रेसच्या राजकारणासाठी आपल्या लेकींचा वापर केला, त्यांच्या सन्मानाला धक्का लावला, त्यांचा अपमान केला. ते कधीच मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन करत नव्हते. ते केवळ राजकारणासाठी आंदोलन करत होते”.

हे ही वाचा >> काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

“…तर मी हरियाणात विनेश-बजरंगविरोधात प्रचार करेन”

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष म्हणाले, “मी आपल्या लेकींचा अपमान केलेला नाही. आपल्या महिला कुस्तीपटूंचा अपमान करणारे कोणी असतील तर ते बजरंग व विनेश आहेत. या लोकांनीच आपल्या लेकींना अपमानित केलं. काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा यांनी हा कट शिजवला होता. या अपमानाची पटकथा हुड्डांनीच लिहिली होती. भाजपाने मला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत बजरंग व विनेशविरोधात प्रचार करण्याचे आदेश दिले तर मी हरियाणात जाऊन प्रचार करेन. काँग्रेसने जे काही केलंय त्याचा एक दिवस त्यांना नक्कीच पश्चाताप होईल.

Haryana Poll : विनेश फोगटची उमेदवारी जाहीर; ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक, काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं होतं. विनेश फोगट, साक्षी मलिक व बजरंग पुनिया यानी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हापासून बृजभूषण व विनेश फोगट यांच्यासह कुस्तीपटूंध्ये संघर्ष चालू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election brij bhushan may campaign against vinesh phogat bajrang punia congress asc