Haryana Election Result : हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. खरं तर हरियाणाच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत मोठा जल्लोष केला. एवढंच काय तर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी जिलेबी पाठवली. त्यामुळे जिलेबीची मोठी चर्चा रंगली. मात्र, हरियाणाच्या निवडणुकीचा आणि जिलेबीचा काय संबंध? तसेच काँग्रेसच्या अपयशाचा आणि जिलेबीचा काय संबंध? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. याबाबत थोडक्यात समजून घेऊ.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत राहुल गांधी यांनी गोहानामध्ये लोकप्रिय असलेल्या जलेबी दुकानाचे मालक स्वर्गीय लाला मतुराम हलवाई यांचा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मतुराम हलवाई यांच्या जिलेबीचा बॉक्स दाखवला होता.

हेही वाचा : Video: हरियाणातील निकालांचा नेमका काय अर्थ घ्यायचा? योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण; म्हणाले, “आता भाजपा…”!

गोहाना येथे निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मतुराम हलवाई यांनी बनवलेल्या जिलेबीचा बॉक्स दाखवत म्हटलं होतं की, देशभर विकली गेली पाहिजे आणि निर्यातही झाली पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. त्यामुळे या मिठाईच्या दुकानाचे कारखान्यात रूपांतर होऊन २० ते २५ हजार लोक काम करू शकतील, असं सांगत देशात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकांचे कशा पद्धतीने नुकसान होते, असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. त्यामुळे या जिलेबीची चर्चा निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात झाली होती.

एवढंच नाही तर हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालात मतमोजणी सुरु झाल्यानंतर आधी काँग्रेस आघाडीवर होते. त्याआधी एक्झिट पोलमध्येही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर काँग्रेसने आघाडी घेताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला या जिलेबी संदर्भातील पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही वेळानंतर भाजपाने आघाडी घेतली आणि काँग्रेस पिछाडीवर गेलं आणि बघता बघता भाजपाला मोठं यश मिळालं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्य़ांनी राहुल गांधींना जिलेबी पाठवत काँग्रेसला ट्रोल केलं. तसेच जल्लोषात जिलेबी वाटली. त्यामुळे सोशल मीडियावर जिलेबी अचानक ट्रेंडमधील आली होती.