डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दिल्या जाणाऱ्या पॅरोलबाबत पंजाब – हरियाणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राम रहीमचा पॅरोल मंजूर करू नये. यासह न्यायालयाने राज्य सरकारसमोर प्रश्न उपस्थित केला आहे की, आतापर्यंत तुम्ही अशा किती गुन्हेगारांना पॅरोल दिला आहे. राम रहीमला सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (SGPC) उच्च न्यायलयाचं दार ठोठावलं होतं. एसजीपीसीच्या याचिकेवर आज (२९ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली.
शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राम रहीमला दिल्या जाणाऱ्या पॅरोलला विरोध केला होता. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तसेच हरियाणा सरकारला सांगितलं आहे की, यापुढे राम रहीमला पॅरोल देण्यापूर्वी तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. यासह न्यायालयाने हरियाणा सरकारला प्रश्न विचारला आहे की, तुम्ही आतापर्यंत अशा किती गुन्हेगारांना पॅरोल दिला आहे. याबाबतची यादी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने हरियाणा सरकारला दिले आहेत.
अलीकडेच राम रहीमला ५० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये राम रहीम २१ दिवस पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. त्याआधी जुलै २०२३ मध्ये तो ३० दिवस तुरुंगाबाहेर होता. तर, जानेवारी २०२३ मध्ये ४० दिवस तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. गुरमीत राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगतोय. त्यााला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२८ ऑगस्ट २०१७ ला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहीमला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. रोहतक येथील तुरुंगात तो २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दुसरीकडे, १७ जानेवारी २०१९ ला पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येच्या गुन्ह्यातही राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राम रहीमची कधी आणि किती काळासाठी सुटका झाली?
२४ ऑक्टोबर २०२०- १ दिवसांची पॅरोल
२१ मे २०२१ – १ दिवसांची पॅरोल
७ फेब्रुवारी २०२२ – २१ दिवसांचा फरलो
जून २०२२ – ३० दिवसांचा पॅरोल
ऑक्टोबर २०२२ -४० दिवसांचा पॅरोल
२१ जानेवारी २०२३ – ४० दिवसांचा पॅरोल
२० जुलै २०२३ – ३० दिवसांचा पॅरोल
२० नोव्हेंबर २०२३ – २१ दिवसांचा फरलो