हरियाणा सरकारचा सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्या विरोधातला चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. आता खेमका यांच्या विरोधात दुसरे आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत हरियाणा सरकार आहे. हरियाणा बियाणे विकास महामंडळाच्या बियांची विक्री कमी झाली म्हणून जबाबदार धरत हे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून १५ ऑक्टोबर २०१२ ते ४ एप्रिल २०१३ या कालावधीत ही विक्री कमी झाल्याने त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तीन आठवडय़ांपूर्वी गुडगाव येथील रॉबर्ट वधेरा-डीएलएफ प्रकरणात अधिकारकक्षा ओलांडल्याचा ठपका खेमकांवर ठेवून आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता पुन्हा खेमकांची कोंडी करण्याचे हरियाणा सरकारचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. खेमका यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य सचिव पी. के. चौधरी यांनी मात्र असे आरोपपत्र दाखल करण्यास आक्षेप नोंदवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव एस. एस. धिल्लोन यांनी हे आक्षेप डावलून आरोपपत्र भरण्यास परवानगी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा