man buries tenant alive in 7-foot pit Crime News : हरियाणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एकाला रोहतकपासून ६० किमी अंतरावरील एका शेतात सात फूट खोल खड्ड्यात जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हत्येच्या तीन महिन्यानंतर फिजिओथेरपिस्ट असलेल्या पीडित व्यक्तीचा मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित जगदीप (४५) हा रोहतक येथील रहिवासी होता आणि बाबा मस्तनाथ विद्यापीठात काम करत होता. गेल्या तीन वर्षांपासून जनता कॉलनी येथील कमला नावाच्या एक महिलेच्या घरात भाड्याने राहत होता. शेतकरी असलेला हरदीप (३६) आणि मजूरी करणारा धरमपाल (५८) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेल्या राजकरण (४०) याचे कमला हिची मुलगी दीपा हिच्याबरोबर लग्न झाले होते आणि त्याला संशय होता की त्याच्या पत्नीची जगदीप याच्याबरोबर कथित मैत्री आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी त्याने चरखी दादरी जिल्ह्यातील त्याच्या पैंतवास गावात दोन व्यक्तींच्या मदतीने एका तळ्याजवळ खड्डा खणला. “ते रोहतक येथील जगदीपच्या घरी पोहचले. त्याला मारहाण केली आणि त्याला वाहनात घालून पैंतवास येथे घेऊन आले आणि त्यांनी त्याला जिवंत पुरले,” असे पोलीस अधिकार्याने सांगितले.
रोहतकचे एसीपी वाय व्ही आर शशी यांनी सांगितेल की, उप-निरीक्षक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला चरखी दादरी मधील रोहतक येथील एका रहिवाशाच्या हत्येबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि रोहतक येथूल बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली. ज्यामध्ये त्यांना आढळून आले की डिसेंबर महिन्यात त्याच्या घरातून जगदीप बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली.
तपासात असेही आढळून आले की, जगदीपच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून या वर्षी ३ फेब्रुवारी एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यात त्यांनी आरोप केला होता की जगदीप याला डांबून ठेवण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.
या घटनेचा सखोल तपास केला असता राजकरण याला खड्डा खणण्यासाठी आणि इतर मदत करणाऱ्या गावकऱ्यांना अटक करण्यात आली.