राज्यासह देशभरात स्वाईन फ्लूचे थैमान वाढत असताना हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी हरियाणा विधानसभेत स्वाईन फ्लूवर मात करण्यासाठीचे एक अजब तर्कट मांडले आहे. देशातील नागरिकांनी हात मिळवण्याऐवजी हात जोडून एकमेकांना नमस्कार करावा यामुळे स्वाईन फ्लूला आळा बसेल, असा जावईशोध अनिल विज यांनी लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विज यांच्या या विधानाला समर्थन देण्याऱ्यांमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही समावेश आहे.राज्यात 'स्वाईन फ्लू'च्या समस्येवरून विरोधकांनी सत्ताधाऱयांना धारेवर धरले असताना प्रत्युत्तर देताना अनिल विज आपल्या भाषणात म्हणाले की, "विदेशी संस्कृतीला सोडा, भारतीयता अंगी बाणवा आणि हात मिळवण्याऐवजी हात जोडून नमस्कार करण्याची गरज आहे." विज यांच्या या विधानानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली तर, विज यांनी आपल्या विधानाशी सहमत असणाऱ्यांना हात उंचावण्याचे आवाहन केले. विज यांच्या विधानाच्या समर्थनार्थ हात उंचावणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री खट्टर यांचाही समावेश होता. इतकेच नाही तर, प्रत्येक भारतीयांनी हात मिळवण्याऐवजी हात जोडून नमस्कार करून विदेशी संस्कृतीचा त्याग करण्याबाबतचा ठरावच संमत करण्याची मागणी विज यांनी सभागृह अध्यक्षांसमोर यावेळी केली. आपण अंघोळ केली असली तरी, समोरच्या व्यक्तीने अंघोळ केली नसेल तर तुमचा हात घाण होणारच. त्यामुळे हात जोडून नमस्कार करणे केव्हाही योग्यच, असेही ते पुढे म्हणाले.