Haryana Mob Lynching Man Suspicion Eating Beef : हरियाणाच्या चरखी दादरी येथे कथित गोरक्षकांच्या एका समुहाने क्रूरपणाचा कळस केला आहे. गोरक्षकांच्या समुहाने येथील एका गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयातून दोन मजुरांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी असून त्याच्या उपचार चालू आहेत. या घटनेचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये दिसतंय काही काही तरूण दोन इसमांना लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करत आहेत. त्याचवेळी काही लोकांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कथित गोरक्षकांच्या या समुहाने मध्ये पडणाऱ्या लोकांना बाजूला केलं आणि मारहाण चालूच ठेवली.
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णायात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह सात जणांना अटक केली आहे.
हे ही वाचा >> Carrying Beef In Nashik Train: नाशिक: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला मारहाण; गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की चरखी दादरी जिल्ह्यातील बाढडा गावातील काही तरुणांनी भंगार विकणाऱ्या एका स्थलांतरित मजुरावर गोमांस शिजवून खाल्ल्याच्या व विकल्याच्या संशयातून मारहाण केली आहे. त्याला काठीने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. २६ वर्षीय साबीर मलिक असं या मारहाणीत ठार झालेल्या तरुणाचं नावं आहे. साबीर हा बाढडा येथे एका झोपडीत राहत होता. या तरुणाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की काही लोकांनी साबीरला भंगार खरेदी करण्यासाठी बोलावलं होतं. तो भंगार घेण्यासाठी गेला आणि तेव्हाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी मजुराच्या घरातील मांसाचे काही नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत. त्याची चाचणी केल्यानंतर समजेल की ते गोमांस होतं की उतर कुठल्या जनावराचं मांस होतं.
हे ही वाचा >> Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
तिघांना न्यायालयीन कोठडी, तर चौघांना पोलीस कोठडी
या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चार जण पोलीस रिमांडमध्ये आहेत. पोलीस आता सातही आरोपींची चौकशी करत आहेत. तसेच मजुराच्या घरातील सदस्य, नातेवाईक, त्याचे शेजारी आणि गावातील इतर नागरिकांकडे चौकशी करत आहेत.