हरियाणामधील महेंद्रगढ, रेवारी आणि झाज्जर जिल्ह्यांमधील काही गावांच्या सरपंचांनी त्यांच्या गावांमध्ये मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घातल्याचे कथित पत्रे जारी केल्याचे उघड झाले आहे. ही पत्रे समाजमाध्यमांतून समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या पत्रांची नोंद घेण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हरियाणा सरकारने संबंधित ग्रामपंचायत आणि सरपंचांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
३१ जुलै रोजी हरियाणातील नूह जिल्ह्यामध्ये हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारामुळे मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घातल्याचे पत्रक ग्रामपंचायतीने काढले. या कथित पत्रांमध्ये असे सांगण्यात आले आहे की काही ग्रामपंचायतींनी मुस्लीम व्यापाऱ्यांना कोणताही व्यापार करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये फेरीवाले, गुरांचे व्यापारी आणि भिक्षा मागणारे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, काही ग्रामपंचायती आणि सरपंचांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायती राज कायद्याच्या कलम ५१ अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
या वृत्ताला दुजोरा देत रेवाडीचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आम्ही ग्रामपंचायती, त्यांचे सरपंच इत्यादींवर प्रशासकीय कारवाई केली आहे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ते त्यांचे उत्तर पाठवतील, या उत्तरांची तपासणी केली जाईल. त्यांनी सादर केलेल्या उत्तरांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल.”