हरयाणातील पलवल शहर दोन तासांमध्ये सहा हत्या झाल्याने हादरले आहे. हल्लेखोराने अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्ला केला असून यात पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. नरेश डांखड असे या आरोपीचे नाव असून तो सैन्यातील निवृत्त जवान असल्याचे वृत्त आहे.

पलवर परिसरात मंगळवारी पहाटे सायको किलरच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या परिसरातच सायको किलरने एक, दोन नव्हे तर सहा जणांची हत्या केली. यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. माथेफिरु नरेश रुग्णालयात कसा पोहोचला हे अद्याप समजू शकलेले नाही. लागोपाठ सहा हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हातात रॉड घेऊन जाणाऱ्या हल्लेखोर दिसला. या आधारे पोलिसांनी  हल्लेखोराचा शोध सुरु केला. सकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिसांना हल्लेखोर दिसला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही नरेशने हल्ला केला. यात पोलीस किरकोळ जखमी झाले. शेवटी बळाचा वापर करुन नरेशला ताब्यात घेण्यात आले. या झटापटीत नरेशही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

नरेश हा सैन्यातील निवृत्त जवान असल्याचे वृत्त ‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिले आहे. ४५ वर्षीय नरेशला मानासिक आजार असून त्याने काही महिन्यांपूर्वी एका पोलिसावरही हल्ला केला होता, असे वृत्तात म्हटले आहे. नरेश हा मूळचा फरिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून तो पलवल येथे राहत होता.

नरेशने पहाटे अडीच ते चार दरम्यान या सर्व हत्या केल्या आहेत. मृतांमध्ये रुग्णालयात उपचार घेणारी महिला आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. अन्य दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सायको किलरची बातमी पलवलमध्ये सोशल मीडियावर वेगाने पसरत गेली. यामुळे भीतीपोटी अनेक जण घरीच थांबले. शेवटी पोलिसांनी नरेशला अटक केल्याचे जाहीर केले आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. नरेशने या हत्या का केल्या, तो खरंच मनोरुग्ण आहे का, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader